लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध गुन्ह्यात आरोपी म्हणून पकडलेली आणि अल्पवयीन असल्यामुळे सुधारगृहात ठेवण्यात आलेली पाच मुले जरीपटक्यातील सुधारगृहातून शनिवारी रात्री पळून गेली. आपल्याला पळून जाताना अडवू नये म्हणून त्यांनी कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. या घटनेमुळे सुधारगृह प्रशासन आणि पोलिसांत प्रचंड खळबळ उडाली आहे.जरीपटक्यातील पाटणकर चौकात हे सुधारगृह आहे. शनिवारी रात्री सुधारगृहाचा एक कर्मचारी जेवण वाढण्याच्या तयारीत होता तर, अन्य जण आपापल्या कामात व्यस्त होते. प्रवेशद्वारावर कुणीच नसल्याची संधी साधून रात्री ७ ते ८ च्या सुमारास जेवण वाढायला आलेल्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात पळून जाण्याच्या बेतात असलेल्या पाच जणांनी मिरची पावडर फेकली. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. तो अर्धमेल्या अवस्थेत पडल्यानंतर आरोपी पळून गेले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुधारगृह प्रशासनात एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी आधी वरिष्ठांना आणि नंतर जरीपटका पोलिसांना कळविले. पोलिसांनी लगेच परिसरात नाकेबंदी करून पळून गेलेल्या मुलांची शोधाशोध सुरू केली, मात्र वृत्त लिहिस्तोवर कुणीही हाती लागले नव्हते. यासंबंधाने अधिक माहिती देण्यासाठी जरीपटका ठाण्यात वारंवार प्रयत्न करूनही पोलिसांकडून माहिती किंवा जखमी कर्मचाऱ्याचे नाव मिळाले नाही.विशेष म्हणजे, येथील सुरक्षा व्यवस्था अत्यंत तकलादू आहे. त्यामुळे येथून मुले पळून जाण्याच्या घटना वर्षभरात किमान दोन ते तीनवेळा घडतात. दोन वर्षांपूर्वी एकाच वेळी चक्क २२ मुले या सुधारगृहातून पळून गेली होती. मात्र, या घटना थांबविण्यासाठी प्रभावी उपाययोजना होत नाही. त्यामुळे आजही तसेच झाले.हत्याकांडातील आरोपी?पळून जाणाऱ्यांमध्ये तिघे खापरखेड्यातील आकाश पानपत्ते याच्या हत्येच्या आरोपात ताब्यात घेतलेले आरोपी होते. त्यांनी १६ डिसेंबर २०१७ ला पानपत्तेच्या डोक्यात गोळ्या घालून त्याची सिनेस्टाईल हत्या केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पळून जाण्याचा कट त्यांनी आधीच रचला होता. त्यासाठी त्यांनी मिरची पावडर आधीच जमवून ठेवली होती.टाईल्सने फोडले कुलूपआरोपींनी पळून जाण्यासाठी मिरची पावडरसोबतच आतमध्ये लावलेल्या टाईल्सचाही वापर केला. या टाईल्सने त्यांनी प्रवेशद्वाराला लावलेले तीन कुलूप तोडले, अशी माहिती घटनास्थळावरील सूत्रांनी लोकमत प्रतिनिधीला दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या कर्मचा-याच्या डोळळ्यात मिरची पावडर फेकून आरोपींनी मारहाण केली. त्या कर्मचा-याचे नाव ताराचंद नेवारे असून ते तेथे सुरक्षा रक्षकासोबतच मदतनिसाचेही काम करतात.