अभय लांजेवार
उमरेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये उशिरा का होईना उमरेड येथे कोविड सेंटर उभारल्या गेले. त्यानंतर नगर पालिका, तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती आणि आरोग्य यंत्रणेची कामगिरी टप्प्याटप्प्याने सुधारत गेली. आता कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी बाधक ठरू शकते, अशी शक्यता विचारात घेता उमरेड तालुक्यात लहान मुलांची योग्य व्यवस्था व्हावी, याकरिता प्रशासन नियोजन आखत आहे. उमरेड येथील ट्रामा केअर सेंटर सुद्धा तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सज्ज होत आहे.
लहान मुलांसाठी ३० खाटांची विशेष व्यवस्था याठिकाणी केली जाणार आहे. ग्रामीण रुग्णालयाला लागूनन ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम अखेरच्या टप्यात आहे. १५ जुलैपर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन समिती याठिकाणी ऑक्सिजन सुविधेसह लहान मुलांसाठी कोविड सेंटरच्या तयारीला लागेल.
उमरेड कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत एकूण ३७० रुग्णांवर औषधोपचार केल्या गेले. सध्या येथे केवळ एका रुग्णावर उपचार सुरू आहे. उमरेडसह तालुक्यातील पाचगाव, बेला आणि मकरधोकडा येथे प्रत्येकी १० बेडची व्यवस्था लहान मुलांसाठी केली जाणार आहे. सिर्सी येथे सुद्धा १० बेडच्या व्यवस्थेसाठी विचारविमर्श केले जात आहे.
उमरेड तालुक्यात आतापर्यंत ७०९५ जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी ६,९३० रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सध्या केवळ २६ रुग्णांवर औषधोपचार सुरू असून येत्या काही दिवसात उमरेड तालुका नक्कीच कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणार असल्याचा विश्वास तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम यांनी व्यक्त केला.
उमरेड तालुक्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६७ टक्के आहे. यादरम्यान प्रशासकीय यंत्रणा चांगलीच राबवली असून यामुळेच उमरेड तालुक्यात उत्तम व्यवस्था होऊ शकली, असे मत पालिकेच्या नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया, माजी पंचायत समिती सदस्या माधुरी भिवगडे, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, माजी उपाध्यक्ष सुधाकर खानोरकर, सुरेश पौनीकर, गंगाधर फलके, दिलीप सोनटक्के, सतीश चौधरी आदींनी व्यक्त केले.
--
कोविड सेंटर सुरूच ठेवावे
उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये सध्या एक रुग्ण उपचार घेत आहे. याठिकाणी १२ परिचारिका आणि तीन डॉक्टर कार्यरत आहेत. सध्या रुग्णसंख्या रोडावली असली तरी सदर कोविड सेंटर बंद करू नये. रुग्णांसाठी सुरूच ठेवावे, अशी मागणी उमेश वाघमारे, रामेश्वर सोनटक्के, रितेश राऊत, संतोष महाजन, क्षितिज खानोरकर, समर भगत आदींनी केली आहे. येथील डॉक्टर आणि परिचारिकांना कायम ठेवून त्यांच्याकडे लसीकरणाचे काम सोपविण्यात यावे, अशीही मागणी केली जात आहे.
----
५५ हजार चाचण्या
उमरेड तालुक्यात आतापर्यंत ५५,८४९ जणांची आरटीपीसीआर आणि रॅपिड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आले आहे. यापैकी ७०९५ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. चाचणीमध्ये सुद्धा उमरेड तालुक्याने उत्तम कामगिरी केली आहे.
-तिसरी लाट आल्यास आम्ही आत्तापासूनच तयारीने आहोत. केवळ उमरेडमध्येच नव्हे तर गावपातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा लहान मुलांसाठी विशेष बेडची व्यवस्था करण्याचे नियोजन आम्ही आखले आहे. हे केवळ कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून आणि नागरिकांच्या सहकार्यामुळेच घडून येत आहे.
प्रमोद कदम, अध्यक्ष, तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती, उमरेड
---
उमरेडच्या ट्रामा केअर सेंटरचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. याचठिकाणी लहान मुलांसाठी व्यवस्था केली जाणार आहे.