नागपूर : लॉकडाऊन आणि कोरोनाच्या वाढत्या परिणामामुळे अनेक पालकांनी मुलांना अंगणाच्या मर्यादेतच ठेवले आहे. शाळाही बंद आहेत. मुले घरबसल्या ऑनलाईन क्लास मोबाईलवर जाॅईन करतात. मात्र, क्लास संपल्यावरही मोबाईल त्यांच्याच हाती असतो. ते मोबाईल गेम खेळण्यात व्यस्त होतात. व्यायामाला आणि खेळण्याला वाव नसल्याने मुलांचे वजन आणि मोबाईलचे व्यसनही वाढत आहे. यामुळे पालकवर्गामध्ये चिंता व्यक्त होत आहे.
५ वर्षांपासून तर १६ वर्षापर्यंतच्या सर्वच वयोगटातील मुलांची ही समस्या आहे. ही मुले फक्त एकट्यातच मोबाईल खेळत नाहीत तर आपल्या मित्रांसोबत ग्रुपचे गेम खेळतात. यामुळे मुलांमध्ये मोबाईलचे व्ससन वाढत आहे. शाळा बंद असणे आणि मैदानी खेळांची सवय तुटल्याने मुलांचे वजन आणि मोबाईलचे वेड वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. १३ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांचे व्यसन तर एवढे वाढले आहे की ते मोबाईलसाठी काहीही जोखीम घ्यायला तयार असतात. यामुळे घराघरातील पालक काळजीत आहेत.
...
विशेषज्ज्ञ म्हणतात...
प्रतिस्पर्धा आणि रचनात्मकता संपली
ऑनलाईन शाळेमुळे मुलांना मोबाईल द्यावाच लागतो. मात्र क्लास संपल्यावरही मुले गेम खेळतात किंवा अन्य साईट व व्हिडिओ पाहण्यात गुंततात. हे अधिक नुकसानकारक आहे. जंक फूडचे सेवन वाढल्याने व कॅलरीज जळत नसल्याने लठ्ठपणा वाढत आहे. मैदानी खेळ नसल्याने प्रतिस्पर्धेची भावना संपत आहे. रचनात्मकताही थांबली आहे.
- डॉ. प्रवीण खापेकर, बालरोग विशेषज्ज्ञ
...
वर्तणुकीतील अनियंत्रितपणा वाढतोय
काहींचे वजन वाढत असले तरी काही मुलांचे वजन घटत आहे. वर्क फ्रॉम होममुळे वेळेवर जेवणाकडे दुर्लक्ष होत आहे. कुटुंबात एकत्रित जेवण करण्याचा अभाव याला कारणीभूत आहे. मोबाईलपासून अधिकाधिक दूर राहून मैदानात, अंगणात खेळणे हेच हिताचे आहे.
- डॉ. रिजवान खान, बालरोग विशेषज्ज्ञ
...
जिद्दीपणा चांगला नव्हे
मोबाईलसाठी मुले लहानपणी हट्ट करतात, मात्र किशोरावस्थेत आल्यावर स्वत:ला समजदार समजायला लागतात. हा बॉर्डर लाइन पिरेड असतो. मुलांच्या संगोपनाकडे गंभीरपणे लक्ष देण्याचे हेच वय असते. मोबाईलच्या सततच्या वापरामुळे ओबेसिटी वाढते, चिडचिडपणा वाढतो, डोळ्यात आग होते. वर्तणुकीतही बदल घडतो. वेळीच आवर घातला नाही तर गुन्हेवृत्ती किंवा आत्मघातकी वृत्ती वाढण्याचे कारण ठरू शकते.
- डॉ. आशीष कुथे, मनोरोग विशेषज्ज्ञ