लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या आठवड्यात दूर पळालेली थंडी पुन्हा परतली आहे. गेल्या १२ तासांपासून शहरातील वातावरणात गारवा वाढल्याने स्वेटरच्या दुकानातील गर्दी पुन्हा वाढायला लागली आहे.
नागपुरातील वातावरण मागील दोन दिवसांपासून बदलले आहे. शहरात मागील २४ तासांमध्ये तापमानाच्या पाऱ्यात १.२ अंश सेल्सिअसने घट झाली. त्यामुळे तापमान २७.८ अंश नोंदविण्यात आले. शनिवारचा दिवस गोंदियामध्ये सर्वाधिक थंड राहिला. तिथे तापमानात एक अंशाने घट होऊन २६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती आणि यवतमाळ येथील वातावरण अन्य ठिकाणांपेक्षा बरे राहिले. चंद्रपुरातही मागील २४ तासात ०.६ अंश घट नोंदविण्यात आली. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान खालावले आहे. नागपुरात दिवसापेक्षा सायंकाळी पारा खालावलेला जाणवला. हवा बोचरी झाल्याने थंडीचा कडाका वाढला होता. सूर्यास्तानंतर वेगाने थंडी जाणवायला लागली.
वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, हवेची दिशा बदलल्याने हवेतील गारठा वाढला आहे. मागील आठवडाभरापूर्वीच वेधशाळेने या संदर्भात अंदाज व्यक्त केला होता. येत्या आठवडाभरातही विदर्भातील वातावरणात गारठा कायम राहणार आहे. गुरुवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळी वातावरण राहील, असे संकेत वेधशाळेने दिले आहेत.