नागपूर : ‘राईस बेल्ट’ म्हणून ओळख असलेल्या रामटेक तालुक्यात मिरचीचे लागवड क्षेत्र हळूहळू वाढत आहे; मात्र मागील १५ दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण असल्याने मिरचीच्या पिकाची चुरड्यासाेबतच फुलकिडींचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. वारंवार फवारणी करूनही या दाेन्ही किडी नियंत्रणात येत नसल्याने रामटेक तालुक्यातील मिरचीचे पीक धाेक्यात व मिरची उत्पादक संकटात सापडले आहेत.
नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरचीला मागील वर्षी चांगला भाव मिळाल्याने यावर्षी रामटेक तालुक्यात मिरचीचे लागवड क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहे. यावर्षी तालुक्यातील मानापूर येथील आनंदराव हिंगे व विनायक हिंगे यांनी प्रत्येकी दोन एकरात मिरचीची लागवड केली असून, रामनाथ मोटघरे यांनी सात, सारंग हिंगे व भाऊराव हिंगे यांनी प्रत्येकी चार, श्रीचंद सातपुते यांनी एक, जगनाथ घोल्लर यांनी तीन एकरात मिरचीची लागवड केली आहे. एकट्या मानापूर शिवारात ४० एकरात मिरचीची लागवड केली आहे.
प्रतिकूल वातावरणामुळे मानापूर, मसला, बोरी, काचूरवाही, वडेगाव यासह अन्य शिवारातील मिरचीच्या पिकावर चुरडा व फुलकिडीचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही या दाेन्ही किडी नियंत्रणात येत नसल्याने काही शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक उपटून रब्बीच्या दुसऱ्या पिकाचे नियाेजन करायला सुरुवात केली आहे. पीकेव्हीचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. नंदकिशोर लव्हे यांनी या नुकसानग्रस्त मिरचीच्या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दूधराम सव्वालाखे, तालुका कृषी अधिकारी दिनेश भोये, मंडळ कृषी अधिकारी चंद्रमणी हाटे, कृषी सहायक नारायण तोडमल उपस्थित हाेते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.
मिरचीचे दर काेसळले
रामटेक तालुक्यातील बहुतांश मिरची उत्पादकांनी मिरचीच्या पिकावर प्रतिएकर ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च केला आहे. बहुतेकांनी बेड तयार करून तसेच मल्चिंग पेपरचा वापर करीत मिरचीची लागवड केली आहे. तालुक्यातील शेतकरी हिरव्या मिरचीची विक्री करतात. १५ दिवसांपूर्वी हिरव्या मिरचीला प्रतिकिलाे २२ ते ३० रुपये भाव मिळायचा. हे दर आठ ते नऊ रुपये प्रतिकिलाेवर आले असून, मिरची ताेडण्याचा खर्च पाच ते सहा रुपये प्रतिकिलाे येत असल्याची माहिती मिरची उत्पादकांनी दिली.
या उपाययाेजना करा
चुरड्याच्या पतंगाचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात निळ्या रंगाचे चिकट सापळे लावावे. निंबोळी अर्काची फवारणी करावी. सुती कापडाला एरंडी तेलात बुडवून ताे कापड झाडावरून फिरवावा यासह अन्य उपाययाेजना कीटकशास्त्रज्ञ डाॅ. डाॅ. नंदकिशोर लव्हे यांनी सुचविल्या आहेत. त्यांनी फवारणी दरम्यान हाेत असलेल्या चुकाही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.