राज्य बालनाट्य स्पर्धा : सकस सादरीकरणाने स्पर्धेचा समारोप नागपूर : राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बाल हौशी कलावंतांना प्रोत्साहित करणाऱ्या या स्पर्धेला विविध संस्थांचा भरघोस प्रतिसाद लाभला आणि बाल प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने या स्पर्धेला हजेरी लावली. ही स्पर्धा सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा समारोप विनोदी बालनाट्यांच्या सादरीकरणाने झाला. अखेरच्या दिवशी स्पर्धेत भट्टी, स्वप्नातला मूर्ख आणि आता बस झाले या तीन बालनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. बालपणीच्या विदारकतेचे ‘भट्टी’भट्टी हे बालनाट्य नवोदिता नाट्य संस्था, चंद्रपूरतर्फे सादर करण्यात आले. नाटकाचे लेखक संजय जीवने तर दिग्दर्शन डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांचे होते. दारूच्या भट्टीशी संलग्न बिजली, सोनू, गवत्या या कुटुंबीयांभोवतीचे हे कथानक अकाली हरविलेल्या बालपणाच्या विदारकतेचे चित्रण करणारे होते. भट्टीत काम करणाऱ्या मुलांना येणारे अनुभव आणि त्यांचे कोमेजणारे बालपण या बालनाट्यातून मांडण्यात आले. रसिकांना अंतर्मुख करणारे हे बालनाट्य होते. यात मयूर कोहळे, ओंकार वायचळ, बकुळ धवने यांनी भूमिका केल्या. तर नाटकाच्या तांत्रिक बाजू कुणाल ढोरे, अॅड. राहुल मेडपल्लीवार, गायत्री देशपांडे, मिथुन मित्रा, शीतल बैस, अश्विनी खोब्रागडे, बबिता उईके, मेघा श्रीराम, स्नेहा गर्गेलवार यांनी पाहिल्या. विनोदी अनुभूतीचे ‘स्वप्नातला मूर्ख’टिळकनगर महिला मंडळाच्या नाट्यरंगतर्फे निखळ विनोदी अनुभूतीचे दर्जेदार सादरीकरण असलेले ‘स्वप्नातला मूर्ख’ हे नाटक झाले. उपस्थितांनी या नाटकाचा आनंद घेतला. अकबर बादशहा आणि चतुर बिरबल यांच्यावरील कथानकाचे हे नाट्य निखळ हास्य निर्माण करणारे होते. यात आर्यन पालकर, ईशान देशपांडे, सागरिका लटी, सोनम जालान, तनया दिवाळे, अनन्या खटी, तन्वी डेग्वेकर, पार्थ डेग्वेकर, आश्लेषा बोकीनपल्लीवार यांच्या भूमिका होत्या.(प्रतिनिधी)
विनोदी बालनाट्यांच्या सादरीकरणात चिमुकले दंग
By admin | Published: January 02, 2015 12:48 AM