नागपूर : काेराेना संक्रमणाचे नाव घेताच अनेकांचा थरकाप उडताे. मात्र तीन चिमुकल्यांनी हसतखेळत या जीवघेण्या आजारावर मात केली आहे. रामनगर निवासी गेंदलाल चाैधरी यांच्या तीन मुलांचा हा यशस्वी लढा सर्वांच्या काैतुकाचा विषय ठरला आहे.
विवेक चाैधरी यांनी सांगितले की सर्वात आधी त्यांना काेराेनाचे संक्रमण झाले. त्यानंतर हळूहळू कुटुंबाच्या सर्व सदस्यांमध्ये लक्षणे दिसून आली. सर्वांची टेस्ट करण्यात आली. मात्र सर्वात धक्कादायक हाेते मुलांना काेराेना संक्रमणाची लागण हाेणे. त्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. ३ वर्षाचा वेदांत, ५ वर्षाची आराेही आणि १३ वर्षाची मुस्कान काेराेना विषाणूने संक्रमित झाली. आता करायचे काय, हा प्रश्न सर्वांसमाेर हाेता. मात्र या मुलांमधला निरागसपणा कायम हाेता, त्यामुळे कुटुंबाच्या सदस्यांमध्ये एक आशा हाेती. त्यांचा निरागसपणा पाहून इतरांना हिंमत मिळाली. या मुलांवर बालराेगतज्ज्ञ डाॅ. विनाेद गांधी यांच्याकडे उपचार सुरू करण्यात आला. मुलांचे वडील विवेक आणि विशाल चाैधरी यांनी सांगितले, घरातील सर्व सदस्य पाॅझिटिव्ह असल्याने सर्व चिंतेत हाेते. मुलांची देखभाल कशी हाेणार, हा प्रश्न हाेता. मात्र या मुलांनी सहजपणे हसतखेळत काेराेनावर मात केल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.