आजोबांच्या ‘तिसऱ्या दिवशी’ नियतीचा घाला : पाटील कुटुंबीयांवर शोककळा, नागरिकांमध्ये संताप नागपूर : निष्काळजीपणे गाडी चालविणाऱ्या वाहन चालकाच्या चुकीमुळे एका नऊ वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना जरीपटका नारी रोडवरील कपिलनगर परिसरातील मैत्री कॉलनी येथे घडली. स्कूल बसचालक गाडी ‘रिव्हर्स’ घेत असताना मुलगा गाडीखाली आला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत जरीपटका येथील जनता हॉस्पिलटमध्ये भरती करण्यात आले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. साहिल रामभाऊ पाटील असे मृत मुलाचे नाव आहे. तो कपिलनगर येथे राहतो. साहिलचे वडील रामभाऊ हे टँकर चालवितात. साहिलची आजी आणि आजोबा (आईचे आईवडील) कपिलनगरला लागून असलेल्या मैत्री कॉलनीत राहतात. साहिलचे आजोबा रामभाऊ रामटेके यांचे नुकतेच निधन झाले. शनिवारी त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम असल्याने साहिल व परिवारातील इतर मुले शाळेत गेली नव्हती. साहिलचे वडील, आई प्रियंका, मोठा भाऊ मयुर हे सर्व आजोबांच्याच घरी थांबले होते. शनिवारी सकाळी ८ वाजता साहिल आपल्या भावासोबत घरासमोर मंडपात खेळत होता. मैत्री कॉलनी निवासी बसचालक आरोपी रंजीतसिंह कमलसिंह सैनी (२६) याने सकाळी घाईगडबडीत स्कूल बस रिव्हर्स करीत काढली. साहिल खेळत होता. तो बसखाली आला. साहिलची आई, आजी आणि इतर महिला धावल्या. या घटनेमुळे कपिलनगर परिसरात तणाव निर्माण झाला असून एकाच कुटुंबातील दोघांच्या मृत्यूने पाटील परिवार व परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातानंतरही मुजोर चालकाची अरेरावी आरोपी बसचालकाचा निष्काळजीपणा आणि नेहमीच चुकीच्या पद्धतीने बस चालवण्यामुळे परिसरातील नागरिकही त्रस्त असल्याचे सांगितले जाते. नागरिकांनुसार शुक्रवारी साहिलच्या आजीसोबत आरोपी रंजीतसिंहने छोट्याशा करणावरून वाद घातला होता. शनिवारी जेव्हा रंजीतच्या बसखाली साहिल सापडला तेव्हा आई, आजी आणि इतर महिला धावल्या. जखमी साहिलला उचलत आरोपीला बस चांगल्या पद्धतीने चालवण्याबाबत समजावू लागल्या. तेव्हा स्वत:ची चूक असूनही आरोपीने साहिलची आई व इतर महिलांशी वाद घातला. त्यांना धक्काबुक्की केली. यात काही महिलांच्या बांगड्याही फुटल्याचे सांगितले जाते. मोठ्या संख्येने नागरिकांचा संताप लक्षात घेता आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
चिमुकल्या साहिलला स्कूल बसने चिरडले
By admin | Published: January 22, 2017 2:02 AM