प्रमोद गिरी व चमूला यश : डोळ्यातून मेंदूत शिरलेली सळाख काढली बाहेर नागपूर : सात वर्षीय चिमुकलीच्या डाव्या डोळ्यातून मेंदूपर्यंत खुपसलेली १२ सेंटिमीटरची सळाक काढण्यास गुरुवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले. प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. प्रमोद गिरी व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी सलग दोन तास किचकट शस्त्रक्रिया करून तिची मृत्यूच्या दाढेतून सुखरूप सुटका केली. बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर जवळच्या कोलमारा येथील रहिवासी असलेली चिमुकली वैशाली गाडेकर हिला डोळ्यात खुपसलेली सळाक, अशा अवस्थेत मेडिकलच्या नेत्रविभागात बुधवारी आणले. विभाग प्रमख डॉ. अशोक मदान यांनी तत्काळ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या न्युरो सर्जरी विभागात तिला पाठविण्याची व्यवस्था केली. या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रमोद गिरी यांनी वैशालीची सिटीस्कॅन व अॅन्जिओग्राफी करून गुरुवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. मानेवरच रक्तवाहिनीला ब्लॉक केले होतेडॉ. गिरी म्हणाले, या शस्त्रक्रियेत मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीला इजा होऊ न देणे व मेंदूत रक्तस्राव होऊ नये हा उद्देश ठेऊन शस्त्रक्रियेला सुरुवात केली. यासाठी आम्ही मानेवरच रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनेवर ताबा (ब्लॉक) घेतला होता. खुपसलेली सळाक गंजलेली व धारधार होती. ती काढण्यास जागा मिळावी म्हणून चेहऱ्याच्या मागच्या भागात जागा तयार करण्यात आली. त्या दोन गंभीर शस्त्रक्रियेचा अनुभव आलानागपूर : डॉ. गिरी म्हणाले, २०१२ मध्ये मेंदूत चाकू खुपसलेले दोन रुग्ण सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आले होते. त्यांच्यावरही शस्त्रक्रिया करून त्या दोघांचे प्राण वाचविले होते. त्या अनुभवाची या शस्त्रक्रियेच्या वेळी बरीच मदत झाली, असेही ते म्हणाले. ही यशस्वी शस्त्रक्रिया मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी, डॉ. डिव्हिक मित्तल, डॉ. विशाल भस्मे, भूलतज्ज्ञ डॉ. लुलू फातिमा वली, डॉ. अभय गाणार, परिचारिका व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या प्रयत्नांमुळे यशस्वी झाली.
चिमुकलीची मृत्यूच्या दाढेतून सुटका
By admin | Published: August 28, 2015 3:04 AM