अपहरण की घातपात? : आरपीएफ, जीआरपीचा तपास सुरूनागपूर : रेल्वे स्थानकावरून आईसोबत असलेली दोन वर्षीय चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली. सोमवारी सकाळी ११.३० वाजता दरम्यानच्या घटनेत सदर बालिकेचे अपहरण की घातपात, असे प्रश्न निर्माण झाले असून आरपीएफ व जीआरपीची यंत्रणा तपास कामाला लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वरी नामक ही महिला बिकानेर-बिलासपूर एक्स्प्रेसने सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान नागपूर स्थानकावर पोहोचली. प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर गाडी थांबली असताना महिला आपल्या मुलीसह पाणी घ्यायला उतरली. या प्लॅटफॉर्मवर पाणी उपलब्ध नसल्याने मुलीला तेथेच ठेवून ती दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गेली होती. मात्र परतली तेव्हा मुलगी गायब झाल्याचे तिने सांगितले. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार तिने रेल्वे पोलिसांना दिली. प्लॅटफॉर्मवर गर्दी नव्हती. मात्र चंद्रपूरच्या चिचपल्ली येथील कुटुंब येथे असल्याचे सांगत महिलेने त्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. जीआरपीच्या पथकाने चंद्रपूरला संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन चौकशी केली, मात्र मुलीची माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. रामेश्वरी नामक ही महिला राजस्थानच्या कोटा येथील निवासी असून चंद्रपूरला आपल्या माहेरी जात होती. घटनेची गंभीरता लक्षात घेता, आरपीएफ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्लॅटफॉर्मवर काही संदीग्ध व्यक्ती आढळून आले आहेत.(प्रतिनिधी)एक मुलगाही झाला होता बेपत्तामिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. ८ वरून एक मुलगा बेपत्ता झाला होता. त्या मुलाचा अद्याप पत्ता लागला नसताना, आणखी एक चिमुकली गायब झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्लॅटफॉर्मवरून ही चिमुकली कशी बेपत्ता झाली, हा संशयाचा विषय आहे. आरपीएफ व जीआरपीने तपासचक्र सुरू केले आहे.
रेल्वे स्टेशनवरून चिमुकली बेपत्ता
By admin | Published: May 03, 2016 3:20 AM