जन्मदात्यांनी सोडले बेवारस : ‘वरदान’मध्ये दाखल नागपूर : दीड महिन्याच्या गोंडस चिमुकलीला मंदिराच्या पायरीवर सोडून तिच्या जन्मदात्यांनी पळ काढला. पोलिसांनी या चिमुकलीवर उपचार केल्यानंतर तिला चिमुकल्यांचे संगोपन करणाऱ्या लक्ष्मीनगरातील ‘वरदान‘ संस्थेत दाखल केले.सेंट्रल एव्हेन्यूवरील भावसार चौकाजवळ एक हनुमान मंदिर आहे. या मंदिराच्या पायरीवर एक गोंडस चिमुकली रडताना दिसल्याने बाजूच्या एका सद्गृहस्थाने तिला जवळ घेतले. आजूबाजूच्यांना गोळा करून त्याने नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. त्यानंतर तहसीलचे सहायक निरीक्षक एल.बी.चव्हाण आपल्या सहकाऱ्यांसह मंदिराजवळ आले. त्यांनी चिमुकलीला ताब्यात घेतल्यानंतर परिसरात तिच्या पालकांबाबत विचारणा केली. कुणीच ओळख न दाखविल्यामुळे तिला मेयोत नेले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी चाईल्ड केअर हेल्पलाईनच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांच्या मदतीने या चिमुकलीला बालकांचे संगोपन करणाऱ्या लक्ष्मीनगरातील वरदान या संस्थेत दाखल केले. ही चिमुकली कुणाची, तिला कुणी येथे बेवारस अवस्थेत सोडले, त्याचा पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
मंदिराच्या पायरीवर चिमुकलीचा हुंदका
By admin | Published: April 17, 2016 2:40 AM