लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत भाजपचे अनेक नेते टीका करीत आहेत. या आंदोलनात चीन पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे, परंतु एनडीएचाच एक प्रमुख घटक पक्ष असलेल्या रिपाई (आठवले) चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र शेतकऱ्यांच्या या आंदेलनात चीन -पाकिस्तानचा कुठलाही हात नसल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर या आंदोलनापर्यंत चीन-पाकिस्तान पोहोचूच शकत नाही, असे म्हणत त्यांनी या आंदोलनावर टीका करणाऱ्या नेत्यांना घरचा आहेर दिला. मात्र पीयूष गोयल यांनी या आंदोलनात माओवादी नक्षलवादी शिरल्याच्या केलेल्या आरोपाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी असे असेल तर याची चौकशी व्हावी, अशी मागणी सुद्धा केली.
केंद्रीय राज्यमंत्री आठवले हे रविवारी एक दिवसीय नागपूर दौऱ्यावर आले होते. सामाजिक न्याय विभागाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. आठवले म्हणाले, शेतकरी कायदा हा शेतकऱ्यांच्याच हिताचा आहे. अडाणी अंबानी यांना मोठे करण्याचा प्रश्नच येत नाही. ते आधीच मोठे आहेत. या कायद्यात शेतकऱ्यांना ज्या काही सुधारणा हव्या असतील त्या सुधारणा करण्यास केंद्र सरकार तयार आहे, परंतु कायदाच मागे घ्या, अशी भूमिका बरोबर नाही, सरकार कायदा मागे घेणार नाही, परंतु सुधारणा करण्यास तयार आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनीही सरकारशी संवाद साधण्यास दोन पाऊल पुढे यावे, असे ते म्हणाले.
पत्रपरिषदेत महेंद्र मानकर, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकर यांनी एनडीएमध्ये यावे
यावेळी आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकट्याच्या ताकदीवर सत्ता येऊ शकत नाही. आठवले यांनी यावेळी शरद पवार यांना दोन वेळा काँग्रेसने पंतप्रधानपद नाकारल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटल्याचे सांगत पवार यांना आम्ही आधीच एनडीए मध्ये येण्याची विनंती केली होती. ते एनडीएमध्ये आले तर राज्याला व देशालाही फायदा होईल, असे सांगितले.