नागपूर : ‘आयआयटी’सह देशातील महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाºया ‘जेईई-मेन्स’च्या फेब्रुवारी महिन्याच्या परीक्षेचा निकाल लागला. अनेक विद्यार्थ्यांनी मार्चच्या दुसऱ्या संधीसाठी तयारी सुरू केली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चिन्मय भुसारी याने ९९.९५ पर्सेंटाईल ‘स्कोअर’ प्राप्त करीत उपराजधानीतून अव्वल स्थान पटकाविले आहे. शहरातील ५० हून अधिक विद्यार्थ्यांचा ‘स्कोअर’ हा ९९ पर्सेंटाईलहून अधिक आहे.
रैवत बापट व ऋषभसिंह गहरवार यांनी ९९.९४ पर्सेंटाईलचा ‘स्कोअर’ प्राप्त करीत दुसरा क्रमांक मिळविला आहे. तर इफ्रा खान व पार्थ कस्तुरे हे ९९.९३ पर्सेंटाईल ‘स्कोअर’सह तृतीय स्थानावर राहिले. याशिवाय आयुष श्रीवास्तव (९९.९२ पर्सेंटाईल), जयंत धर्माळे (९९.९१ पर्सेंटाईल) यांनीदेखील यश मिळविले.
‘एनटीए’तर्फे २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. ‘कोरोना’चा प्रकोप अद्यापही कायम असल्याने ‘ऑनलाईन’ माध्यमातून ही परीक्षा झाली. नागपूर तसेच विदर्भातील विविध महाविद्यालयातून सात हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नागपुरातून ‘जेईई-मेन्स’ दिली.
आता तयारी १५ मार्चची
९५ हून अधिक पर्सेंटाईलचा ‘स्कोअर’ असूनदेखील विद्यार्थी आणखी नव्या जोमाने पुढील परीक्षा देण्यासाठी तयारी करीत आहेत. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या चार प्रयत्नांपैकी ही पहिली परीक्षा होती. आता आणखी तीन प्रयत्न विद्यार्थी देऊ शकतात. यानंतर १५ ते १८ मार्च, २७ ते ३० एप्रिल आणि २४ ते २८ मे या काळात परीक्षा देण्याच्या चार संधी मिळणार आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी १५ मार्चच्या टप्प्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.