नागपूर : नागपूरलगतच्या बेसा या गावातील एका निर्माणाधीन टॉयलेटच्या खड्ड्यात एक चितळ पडले. सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर त्याला ट्रॉन्झिट ट्रीटमेन्ट सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढून निसर्गमुक्त करण्यात आले.
२१ डिसेंबरला सकाळी ही घटना उघडकीस आली. सुदैवाने हा टॉयलेटचा खड्डा रिकामा होता. सकाळी हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. त्याला बाहेर पडता येत नव्हते. नागरिकांनाही त्याला काढता येणे शक्य नव्हते. अखेर ट्रान्झिटच्या सेंटरच्या नियंत्रण कक्षाला कॉल केल्यावर वनरक्षक नारायण मुसळे, वनमजूर रवी मिटकरी, मदतनीस बंडू मंगर आणि वाहनचालक विलास मंगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जाळी टाकून त्याला कसलीही इजा न होऊ देता सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. डॉ. सैय्यद बिलाल यांनी त्याची तपासणी केल्यावर ते पूर्णपणे सुदृढ असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय तपासणीनंतर लगेच निसर्गमुक्त करण्याचा निर्णय घेऊन अंबाझरी राखीव वनात त्याला निसर्गमुक्त करण्यात आले. आतापर्यंत अंबाझरी जैवविविधता उद्यानात रेस्क्यू करून आणि उपचार झालेले सहा चितळ ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरने निसर्गमुक्त केले आहेत.