सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार..; चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 05:28 PM2022-11-17T17:28:55+5:302022-11-17T17:54:35+5:30
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून वातावरण तापलं आहे.
नागपूर : सावरकरांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. महाराष्ट्रात येऊन तुम्ही जर आमच्या अस्तित्वावर घाला घालणार असाल तर ते आम्ही कधीही खपवून घेणार नाही, असे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघराहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या. तर, सावरकरांचा सतत अपमान करणांऱ्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार कसे काय फिरु शकतात? अशी खोचक टीका ठाकरेंवर केली.
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून वातावरण तापलं आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचा निषेध म्हणून पुतळे जाळण्यात येत आहेत. नागपुरातही भाजप युवा मोर्चा आणि महिला आघाडीच्यावतीने चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत राहुल गांधींचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला.
एका बाजूला सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करायची आणि दुसरीकडे त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचे हात बळकट करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्याचे चिरंजीव आदित्य ठाकरे करत आहेत. ज्यांच्या विचाराने जाज्वल्य इतिहास उजळला त्यांची महाराष्ट्रात अवहेलना केली जाते, हे कसं काय शक्य आहे असा प्रश्न महाष्ट्रातला प्रत्येकजण विचारतोय, असे वाघ म्हणाल्या. पुढे बोलताना, कुणीतरी काहीतरी लिहून द्यायचं आणि आपण ते म्हणायचं ही कसली राजकीय प्रगल्भता? ही तर राजकीय दिवाळखोरी आहे, अशी खोचक त्यांनी टीका राहुल गांधींवर केली.
तुम्हाला मानापमान आहे आम्हाला नाही का?
संजय राठोडबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चित्रा वाघ पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून आले. तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे पण आरोप करण्याचा नाही, असे त्या म्हणाल्या. माझी भूमिका स्पष्ट आहे, मी माझी लढाई सोडलेली नाही. संजय राठोडविरुद्धचा लढा सुरुच राहणार. संजय राठोड यांच्याशी माझी वैयक्तिक दुश्मनी नाही. पण जे झालं ते चुकीच होतं आणि त्यासाठीच मी लढत होते, असही त्यांनी सांगितलं. यवतमाळमध्ये झालेल्या पत्रपरिषदेवरुन प्रश्न विचारला असता, तुम्हाला मानापमान आहे आम्हाला नाही का? असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला. तुम्हाला जर इतक वाटत असेत तर तुम्हीही माझ्या लढ्यात सहभागी व्हा असे म्हणत चुकली असेल तर एक हजारदा चित्रा वाघ माफी मागेल पण एक महिला म्हणून घेरत असाल तर मी पण चित्रा वाघ आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
महिलांची सुरक्षा हाच आमचा अजेंडा
राज्यात गत तीन महिन्यांपासून महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सरकारने पुढाकार घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली आहे. महिलांवर होणारे अत्याचार दूर व कमी व्हावे यावर आमचे कार्य सुरू असून, महिलांची सुरक्षा हाच आमचा अजेंडा असल्याची भूमिका त्यांनी मांडली. गत तीन महिन्यांत जिथे महिलांवर अत्याचार झाले, त्यामधील संबंधितांवर लगेच कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वीच्या सरकारने विविध घटनांवर डोळेझाकपणा करून महिलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले, असेही त्या म्हणाल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"