- सांस्कृतिक क्षेत्राच्या धमाकेदार प्रारंभाला लागले संक्रमणाचे सुतक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संवेदनशील मनांत सृजनाचे क्षेत्र म्हणून सांस्कृतिक क्षेत्राची ओळख आहे. मात्र, २०२० हे वर्ष सृजनाच्या बाबतीत निष्ठुर ठरले. सुसंवाद असो वा विसंवाद, या दोन्ही भावनांतून निर्माण होणारे आविष्कार हे सांस्कृतिक क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. मात्र, कोरोना संक्रमणाने भौतिक स्वरूपात एकत्र येण्याची मनाई झाली आणि संवादापासून सांस्कृतिक क्षेत्र अलिप्त झाले. म्हणायला ऑनलाईन यंत्रणा होत्या. मात्र, संवेदनेच्या पातळीवर त्या पुरेशा नव्हत्या. कालांतराने या यंत्रणांचाही उबग आला आणि कधी जाणार हा काळ, अशी आर्त हाक कलावंत चित्रगुप्ताकडे करू लागले. तब्बल आठ महिने आणि त्यानंतरही म्हणजे वर्ष संपत आल्यावरही काहीच न केल्याची सल संपलेली नाही. न भूतो अन् बहुधा न भविष्यति, अशी स्थिती सांस्कृतिक क्षेत्राने अनुभवली. क्रांतीचे शस्त्र उगारायचे तर कुणासाठी आणि कशासाठी, हा प्रश्न होता. कारण, ही क्रांती उत्क्रांतीची नव्हे तर विनाशाचीच ठरली असती, याची पुरती जाणीव काही कलावंतांच्या संसर्गाने झालेल्या एक्झिटने करवून दिली. असे हे वर्ष चित्रगुप्ताने आपल्या भल्यामोठ्या भूत-वर्तमान-भविष्यवेधी नोंदवहीतून गाळून टाकावे, अशी भावना सगळ्यांची आहे.
नवे वर्ष, नवे आव्हान.. अशा चिरपरिचित अंदाजाने २०२०मध्ये सांस्कृतिक क्षेत्राची सुरुवात झाली. ९३व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाने वर्षाचा प्रारंभ झाला आणि नेहमीच्या वादावादीने हे संमेलन पार पडले. नागपूर-विदर्भातून या मोठ्या संख्येने सरस्वतीचे प्रतिनिधी सहभागी झाले. यासोबतच हौशी राज्यनाट्य स्पर्धांचे फडही रंगायला लागले. तिकडे शंभराव्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाची तयारी सुरू झाली. तारखा निश्चित झाल्या आणि नियोजनही झाले. नाही म्हणता म्हणता या संमेलनाचा एक भाग नागपुरातही होणार होता. मात्र, कोरोना संसर्गाच्या आक्रमणाने ही सर्व गजबज अनिश्चित काळासाठी थांबली ती थांबलेलीच राहिली आणि प्रचंड ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर उसळणारी राख सर्वत्र पसरावी तसे धास्तीची, संशयाचे अन् धोक्याचे मळभ सर्वत्र पसरले. जणू बोलता माणूस अचानक देवाघरी जावा नि संपूर्ण घर सुतकात जावे, अशी ही स्थिती आहे. १७ मार्चपासून देशात सांस्कृतिक कार्यक्रमांना मज्जाव करण्यात आला. २२ मार्चपासून देशात टाळेबंदीची घोषणा होण्यापूर्वी दोनच दिवसाआधीपासून महाराष्ट्र टाळेबंदीत गेला. तेव्हापासून नाटक, नृत्य, गायन असो वा व्याख्याने, साहित्यिकांच्या चर्चा, परिसंवाद सगळेच स्तब्ध झाले. ही स्तब्धता ऑनलाईन यंत्रणेच्या उपक्रमातून दूर करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, ते तितकेसे यशस्वी ठरले नाहीत. ५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिनी सांस्कृतिक क्षेत्रावरची टाळेबंदी दूर करण्यात आली असली तरी टाळेबंदीने आणलेली मळभ वर्षाच्या अखेरपर्यंत दूर झालेली नाही.
* साहित्य संमेलन अध्यक्षांविना : प्रथमच संमेलनाध्यक्षाविना संमेलनाचा झाला समारोप. संमेलनाच्या उद्घाटनानंतरच संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची प्रकृती खालावली. उद्घाटनाला ते व्हीलचेअरवर उपस्थित राहिले. त्यानंतर लगेचच त्यांना मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, भगव्या पक्षांच्या आक्रमकतेपुढे संमेलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहू नये आणि दिब्रिटो यांच्या अडचणीत वाढ होऊ नये म्हणून हा बनाव असल्याचा आरोप झाला.
* वि.सा. संघाचे संमेलन स्थगित : विदर्भ साहित्य संघाचे ६७वे साहित्य संमेलन १४ व १५ मार्च रोजी हिंगणा, जि. नागपूर येथे होणार होते. मात्र, ते स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला.
* शंभरावे नाट्यसंमेलन स्थगित : २७ मार्चपासून सांगली येथून १००व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाची नांदी वाजणार होती आणि जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यांत एकेका पडावानंतर मुंबईला १४ जून रोजी हे संमेलन पोहोचणार होते. मात्र, संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव बघता आणि केंद्र व राज्याच्या दिशानिर्देशानुसार संमेलन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.
* ऑनलाईनचा वाढला पूर : टाळेबंदीत अनेकांच्या कल्पकतेला धुमारे फुटले. अनेकांनी कोरोना वॉरिअर्सना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळे शॉर्टव्हिडिओ बनवून मनोबल वाढविण्याचे प्रयत्न केले. मात्र, काहीच काळात या कल्पकतेच्या पुराला ओहोटी लागली.
* आभासी उपक्रम : तब्बल दीड-दोन महिने कलावंतांनी घरीच विना उपक्रम काढल्यानंतर काहींनी ऑनलाईन गाण्याचे उपक्रम सुरू केले. त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. त्याच शृंखलेत काही नृत्यसंघांनी आणि काही नाटककारांनी आभासी उपक्रमाद्वारे आपले प्रयोग सादर केले. मात्र, या प्रयत्नांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने नंतर असे उपक्रम आढळले नाहीत. गायनाचे कार्यक्रम मात्र सुरूच राहिले.
* कलावंतांना मदत आणि वाद : नाट्यपरिषदेने केवळ व्यावसायिक रंगभूमीवरच्या कलावंतांनाच मदत जाहीर करण्याची घोषणा केली आणि विदर्भातून त्याविरोधात आवाज बुलंद झाला. त्यात ‘लोकमत’ची भूमिका मोलाची ठरली आणि त्यानुसार विदर्भातील हौशी कलावंतांनाही मदत जाहीर करण्यात आली.
* नाट्यवितरणाची साखळी : कोरोना आणि टाळेबंदीत प्रथम नाट्यवितरणाची साखळी तयार झाली. या साखळीत प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधीची वर्णी लागली.
* नाटकांसाठी ओटीटी : याच काळात मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे रिलीज झाले. त्याच धर्तीवर नाटकांसाठीही ओटीटी असावे, असे प्रयत्न सुरू झाले. विशेष म्हणजे, यासाठी नागपुरातून पुढाकार घेतला गेला.
* झाडीपट्टीची रंगत गेली : टाळेबंदी उठल्यानंतरही झाडीपट्टी रंगभूमीवर रंगत आली नाही. सीझन सुरू होताच, एका कलाकाराचा संसर्गाने मृत्यू होताच आणि ग्रामीण भागात नियम पाळले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर कलावंतांनीच यंदा नाटक नको, असा पुढाकार घेतला.
* नृत्यशिक्षकांनी पुकारला एल्गार : टाळेबंदीत रोजगार हिरावल्याने टाळेबंदी उठविण्यासाठी नृत्य शिक्षकांनी शासनाविरुद्ध एल्गार पुकारला. संविधान चौकात नृत्य करून सुरू केलेल्या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले.
* सिनेमागृहे बंदच : सिनेमागृहांना परवानगी मिळूनही नवे चित्रपट नसल्याने आणि प्रेक्षकांनी संसर्गाच्या भीतीने पाठ फिरवल्याने थिएटर्स बंदच राहिली.
...............