लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुठल्याही शुभकार्याची सुरुवात गोडाने होते आणि प्रेमाची सुरुवात चॉकलेटने. तशी ही स्टाईल म्हणजे फॅन्टसीच. मात्र, अवास्तव नक्कीच नाही. कल्पकतेला प्रेमात अगण्य स्थान असते आणि म्हणूनच ‘चंद्र-तारे तोडण्या’ची भाषा प्रेमात केली जाते आणि ही भाषा म्हणजे सहृदय भावना असते. मग चॉकलेटने दुरावा दूर होतो अन् प्रेमात गोडवा निर्माण होतो, हे कसे नाकारता येईल. आता हेही गरजेचे नाही, प्रत्येक प्रेम म्हणजे ‘तेच’ असेल. मैत्रीचेही असू शकते, बहीण-भावाचेही असू शकते अन् आई-वडिलांचेही. आठवत असेल लहानपणी बाबांनी रागावले, धोपटले की नंतर त्यावर विरजण म्हणून हाती पडत होते चॉकलेट. चेहऱ्यावर कसे हसू फुलत होते आणि मनातील राग शांत होत होता. ते दिवस आठवले की चॉकलेटच्या गोडव्यात रमायला होते. हल्लीच्या तरुण-तरुणांच्या मैत्रीतील गोडवा अर्थात दुवा म्हणजेही चॉकलेट आणि ‘त्या’ प्रेमाला आधारही असतो तो चॉकलेटचा गोडवाच. असा हा स्वीट, गोड, मधूर काय म्हणायचे ते म्हणा... आवडत्या व्यक्तीला चॉकलेट देऊन त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मोहक हास्य फुलविणारा दिवस म्हणजे ‘चॉकलेट डे’! मग, काय फुलविणार हा हसू?आपण भारतीय उत्सवप्रिय आहोत आणि ज्यात आनंद मिळेल त्याचे अनुकरणप्रियही आहोत. पाश्चिमात्य देशात तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला ‘व्हॅलेंटाईन डे’ आपण हातोहात उचलला आणि त्या रंगात प्रेमाच्या बागा फुलायलाही लागल्या. हा दिवस १४ फेब्रुवारीला असतो आणि तो दिवस येणार म्हणून त्या दिवसाची पार्श्वभूमी तयार करणारा ‘व्हॅलेंटाईन वीक’ असतो. त्या सप्ताहाला सुरुवात होते ती ७ फेब्रुवारीपासून. आता सप्ताह साजरा करायचा तर प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्यही हवेतच ना! म्हणून मग पहिला दिवस ‘रोज डे’. गुलाब रोपटे रोजच उमलत असले तरी या दिवसाचे महत्त्व औरच. आता गुलाब पुष्प दिल्यावर प्रपोज करावेच लागेल. म्हणून दुसरा दिवस ‘प्रपोज डे’. प्रपोज केल्यावर नकार-होकाराच्या द्वंद्वात फसलेल्या प्रेयसीला आणखी जवळीक देता यावी म्हणून गोडवा हवा आणि म्हणून साजरा व्हायला लागला ‘चॉकलेट डे’.
आज 'चॉकलेट डे' : स्वीट चॉकलेट...माझ्याकडून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 1:09 AM