लोकमत कॅम्पस क्लबच्या कार्यशाळेत करिअर मार्गदर्शक जगदीश अग्रवाल यांचे मत नागपूर : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मुलांच्या भविष्याला घेऊन चिंता व्यक्त करण्यात येते. अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी लोकमत कॅम्पस क्लबद्वारे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सक्करदरा येथील कमला नेहरू महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित कार्यशाळेत अग्रवाल स्टडी सेंटर प्रा. लि.चे संचालक व करिअर मार्गदर्शक जगदीश अग्रवाल व ‘नो युअर टॅलेंट’च्या संचालक डॉ. रश्मी शुक्ला यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत अग्रवाल म्हणाले की, आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी सोशल मीडियापासून दूर राहावे. केवळ इंजिनीअरिंग किंवा मेडिकल हेच करिअरचे सर्वोत्तम स्रोत नाही, तर इतरही क्षेत्रात आपण चांगले करिअर करू शकतो. ते विद्यार्थ्यांना म्हणाले की, कुणाच्या सांगण्यावरून आपल्या करिअरची निवड करण्यापेक्षा गुणवत्तेच्या आधारावर करा, त्यामुळे यश नक्कीच तुमच्या पदरात पडले. पालकांना संबोधित करताना म्हणाले की, मुलांच्या करिअरसाठी तुम्हालाही त्याग करावा लागेल. अभ्यासासाठी अशा संस्थेची निवड करा, की जिथे गर्दी राहत नाही. त्याचबरोबर डॉ. शुक्ला यांनी सुद्धा मुलांना स्वत:ची प्रतिभा ओळखून आपले करिअर निवडण्याचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या की, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करा व लक्ष्याकडे वाटचाल करा. चांगले मार्गदर्शन मिळवा. त्या पालकांना म्हणाल्या की, मुलांना करिअरसाठी दबाव टाकू नका. कार्यशाळेला सीबीएसई, स्टेटबोर्ड, मेडिकल, इंजिनीअरिंग व अन्य शाखेसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या शंकेचे समाधान केले. कार्यक्रमाचे संचालन पुनम तिवारी महात्मे यांनी केले.(प्रतिनिधी)
गुणवत्तेवर करा करिअरची निवड
By admin | Published: April 27, 2017 2:18 AM