लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खाद्यतेलाच्या पॅकेजिंग लेबलवर कोलेस्ट्रॉल फ्री आणि झिरो कोलेस्ट्रॉल उत्पादन लिहिता येणार नाही. यासंदर्भात एक विशेष तपासणी मोहीम अन्न व औषध प्रशासन विभाग सुरू करणार आहे.एका नामांकित कंपनीच्या वनस्पती तेलाच्या चार ब्रॅण्डच्या पॅकेजिंग लेबलवर कोलेस्ट्रॉल फ्री आणि झिरो कोलेस्ट्रॉल असे लिहिले आहे. वर्धा येथील अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने कंपनीच्या आपत्तीजनक जाहिरातीच्या विरोधात केस दाखल केली आहे. कंपनीला नोटीस जारी करून उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.हे प्रकरण नागपूर विभागाचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्यासमोर सुनावणीसाठी आले आहे. या प्रकरणी आरोप सिद्ध झाले तर कंपनीवर प्रत्येक प्रकरणात १० लाखांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. अशाच प्रकरणात एफडीएने अन्य कंपनीला नोटीस जारी केली आहे. याशिवाय नागपूर विभागात खाद्यतेलाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या पॅकेजिंग लेबलची तपासणी करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा खोटा दावा करण्यात येणाऱ्या सर्व कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएने म्हटले आहे.बाजारपेठेत विविध कंपन्यांचे विभिन्न प्रकारचे खाद्यतेल उपलब्ध आहेत. अनेकांनी लेबलवर कोलेस्ट्रॉल फ्री, झिरो कोलेस्ट्रॉल अथवा कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा दावा करणारी जाहिरात केली आहे. तसे पाहता वनस्पती आधारित तेलात कोलेस्ट्रॉल नसतेच. प्राण्यावर आधारित उत्पादनात जसे डेअरी उत्पादने व मासांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण असते. त्यामुळे खाद्यतेलाच्या पॅकिंगवरील लेबलवर कोलेस्ट्रॉल फ्री उत्पादन असल्याची जाहिरात करणे चुकीचे आहे.एफडीएने नामांकित कंपनीच्या खाद्यतेलाच्या जाहिरातीच्या विरोधात कलम २.४.२ (१) पॅकेजिंग आणि लेबलिंग नियमानुसार कारवाई केली आहे. कंपनीकडून समाधानकारक उत्तर अद्याप आलेले नाही. कंपन्यांनी असा चुकीचा दावा करू नये, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खाद्यतेलाच्या पॅकिंगवर कोलेस्ट्रॉल फ्री लिहिता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 10:55 PM
खाद्यतेलाच्या पॅकेजिंग लेबलवर कोलेस्ट्रॉल फ्री आणि झिरो कोलेस्ट्रॉल उत्पादन लिहिता येणार नाही. यासंदर्भात एक विशेष तपासणी मोहीम अन्न व औषध प्रशासन विभाग सुरू करणार आहे.
ठळक मुद्दे कंपन्यांवर होणार कारवाई : एफडीएची विशेष मोहीम