दरवर्षी उपलब्ध जागेपेक्षा ५ पट अधिक अर्ज : कौशल्य विकासाकडे विद्यार्थ्यांचा कल
नागपूर : कौशल्यावर आधारित मनुष्यबळ निर्माण करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)कडे गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आयटीआय करून अल्पावधीत स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात. नागपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत आयटीआयला विद्यार्थ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. उपलब्ध जागांच्या तुलनेत पाचपटीने अधिक अर्ज येतात. यंदा दहावीचा निकाल ९९ टक्क्यांवर लागला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी चुरस वाढणार आहे.
नागपूर जिल्ह्यात १६ शासकीय व ८९ खासगी आयटीआय आहेत. अद्यापही प्रवेशप्रक्रियेचा टाइमटेबल व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घोषित केला नाही. पण दहावीच्या निकालाच्या पूर्वीपासून विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत २,१६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, १,८७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी कन्फर्म केली आहे. नागपूर जिल्ह्यातील आयटीआयमध्ये ३५ ट्रेड असून ८,५६९ जागा आहे. जिल्ह्यात पारशिवनी येथील शासकीय औद्योगिक संस्था फक्त आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच आरक्षित आहे, तर शहरातील इंदोरा येथील उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा कोटा ८० टक्के आहे.
- स्थानिक विद्यार्थ्यांना ९० टक्के प्रवेशाची संधी
आयटीआयमध्ये गेल्यावर्षी स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेशात ७० टक्के प्राधान्य दिले होते, तर बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ३० टक्के प्राधान्य होते. यंदा स्थानिक विद्यार्थ्यांना ९० टक्के, तर बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना १० टक्केच प्रवेशाला प्राध्यान्य दिले आहे.
- या ट्रेडला असते विद्यार्थ्यांचा कल
ट्रेट जागा (शासकीय आयटीआयमध्ये)
इलेक्ट्रिशियन ३२०
फीटर २२०
एरोनॉटिकल स्ट्रक्चरल
अॅण्ड इक्विपमेंट फिटर २०
रेफ्रिजेरेशन अॅण्ड एअर २४
कंडीशनिंग
मशिनिस्ट १२०
टर्नर १४०
- दृष्टिक्षेपात
शासकीय आयटीआयची संख्या-१६
शासकीय आयटीआयच्या जागा-३,६४०
खासगी आयटीआयची संख्या-८९
खासगी आयटीआयच्या जागा-६५४८
- अर्जाची स्थिती
नोंदणी - २१६२
कन्फरमेशन - १८७६
- या दोन ट्रेडचा कटऑफ जातो ९०वर
एरोनॉटिकल स्ट्रक्चरल अॅण्ड इक्विपमेंट फिटर हा ट्रेड महाराष्ट्रमध्ये केवळ नागपूरच्या शासकीय आयटीआयमध्ये आहे. याच्या केवळ २० जागा असून, यासाठी फ्रान्सचे शिक्षक प्रशिक्षण देतात. दोन वर्षांपासून हा ट्रेड नागपूर आयटीआयमध्ये सुरू असून, याचा कटऑफ ९०वर जातो. तसेच नागपूर आयटीआयने ट्रॅक्टर मॅकेनिक या ट्रेडच्या संदर्भात महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीशी करार केला असून, या ट्रेडच्या विद्यार्थ्यांना चार महिने महिंद्रा कंपनीत प्रशिक्षण मिळते. या ट्रेडसाठी प्रवेशक्षमता केवळ २४ विद्यार्थ्यांची आहे.
- कोरोनामुळे गेल्यावर्षी ३० टक्के जागा रिक्त राहिल्या
तसे आयटीआयमध्ये दरवर्षी १०० टक्के प्रवेश होतात. पण गेल्यावर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा जास्त कल नसलेल्या ट्रेडच्या ३० टक्के जागा रिक्त राहिल्या. शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने यंदा आयटीआयला प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे यंदा कुठल्याही ट्रेडला जागा रिक्त राहणार नाही, अशा विश्वास प्राचार्य हेमंत आवारे यांनी व्यक्त केला.