लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हलबा व मुस्लिमबहुल मध्य नागपूर मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीकडून एकही हलबा उमेदवार न दिल्यामुळे समाजात नाराजीचा सूर होता. समाजातील नऊ जणांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यातील दहा जण सोमवारी अर्ज परत घेणार असून मूळचे काँग्रेसचे रमेश पुणेकर हे हलबा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव उमेदवार असतील. यामुळे मध्य नागपुरातील चुरस वाढण्याचे चित्र आहे.
मध्य नागपुरात मागील तीन निवडणुकांमध्ये भाजपचे विकास कुंभारे हेच विजयी झाले होते. यावेळेस भाजपकडून प्रवीण दटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून बंटी शेळके परत रिंगणात उतरले आहेत. दोन्ही मोठ्या पक्षांनी हलबा समाजाचा उमेदवार न दिल्याने नाराजीचा सूर होता. त्यामुळेच अकरा जणांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. यातील कोण उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढणार हे निश्चित करण्यासाठी हलबा क्रांती सेनेतर्फे रविवारी टेलिफोन एक्सचेंज चौकाजवळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला तीन ते साडेतीन हजार लोक उपस्थित होते. यात हलबा महासंघ, राष्ट्रीय आदिम कृती समिती, आफ्रोह संघटनेचे पदाधिकारी होते. यावेळी केवळ रमेश पुणेकर हेच हलबा समाजाचे प्रतिनिधित्व करतील असे निश्चित करण्यात आले. त्यामुळे इतर दहा उमेदवार सोमवारी अर्ज मागे घेणार आहेत, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. भाजप व काँग्रेसमधील हलबा पदाधिकारीदेखील या बैठकीला उपस्थित होते हे विशेष.
विदर्भात उमेदवार नाही तेथे ‘नोटा’विदर्भातील १४ विधानसभा मतदारसंघांत हलबा समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. ज्या जागांवर हलबा समाजाचे उमेदवार उभे नाहीत तेथे ‘नोटा’चा वापर करण्याचे आवाहन हलबा समाजाकडून करण्यात आले आहे. दक्षिण नागपुरातून धनंजय धापोडकर व पूर्व नागपुरातून मुकेश मासूरकर हे हलबा समाजाचे उमेदवार असतील अशी माहिती हलबा क्रांती सेनेचे अध्यक्ष जगदीश खापेकर यांनी दिली.