नागपूर, दि. 28 - राज्याराज्यातील गुन्हेगारांना नजरकैद करून गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहे. आंतरराज्यीय गुन्हे समन्वय परिषद २०१७ येथील एन. कॉप्स. पटेल बंगला, छावणी (सदर) येथे सोमवारी पार पडली. या परिषदेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
राज्याराज्यातील गुन्हेगारांचे आणि गुन्हेगारीसंबंधीच्या माहितीचे आदानप्रदान करता यावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेच्या पुढाकारात नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका वठविली. या परिषदेला महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल, मध्य प्रदेश राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक कैलास मकवाना, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर यांच्यासह ठिकठिकाणचे ३० वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. परिषदेच्या उद्घाटनानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेला सुरुवात झाली. आंतरराज्यीय गुन्हेगारी, शस्त्र तस्करी, अंमली पदार्थ तस्करी, मानवी तस्करी, बेपत्ता व्यक्ती, अनोळखी मृतदेह, गुन्हेगारांची देवाणघेवाण, नक्षलवाद, फ्रंटल आॅर्गनायझेशन, जनावरांची अवैध वाहतूक आदी विषयांवर समन्वय साधन्यासाठी महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. सीआयडीचे कैलास मकवाना, संजीवकुमार सिंघल, जी. के. पाठक, पोलीस उपमहानिरीक्षक छिंदवाडा, इर्शाद अली पोलीस उपमहानिरीक्षक, बालाघाट, अभिनाश कुमार डीआयजी (आयबी), सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, प्रतापसिंग पाटणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर, अंकुश शिंदे पोलीस उपमहानिरीक्षक, अतिरिक्त आयुक्त श्यामराव दिघावकर, विशेष शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे, वाहतूक शाखेचे रवींद्रसिंग परदेशी, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, उपायुक्त स्मार्तना पाटील, उपायुक्त राकेश ओला, उपायुक्त राहुल माकणीकर, उपायुक्त एस. चैतन्य त्याचप्रमाणे अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, वर्धा येथील पोलीस अधीक्षक निर्मलादेवी, चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठक्कर, भंडारा येथील पोलीस अधीक्षक विनीता शाहू, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शैलेष बलकवडे, गोंदियाचे डॉ. दिलीप पाटील भुजबळ, नागपूर जीआरपीचे अधीक्षक डॉ. अमोघ गावकर, गडचिरोलीचे अतिरिक्त अधीक्षक महेंद्र पंडित, यवतमाळचे अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, बुलडाण्याचे अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, अकोल्याचे अपर पोलीस अधीक्षक विजय सागर, अमरावतीचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित आदींनी या परिषदेत आपले विचार मांडतानाच गुन्ह्यांचा तातडीने छडा कसा लावायचा आणि गुन्हेगारी नियंत्रित कशी करायची, त्यासंबंधाने सादरीकरण केले. या परिषदेच्या समारोपीय सत्रात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्या राज्यातील सीआयडी अन्य राज्याच्या सीआयडी आणि पोलिसांच्या मध्ये समन्वयक म्हणून भूमिका वठविणार, असा निर्णय घेण्यात आला.
५५० गुन्हेगारांचा डाटा...
या परिषदेत ठिकठिकाणच्या ५५० खतरनाक गुन्हेगारांच्या माहितीचे आदानप्रदान करून त्यांना कसे नियंत्रित करायचे, त्यासंबंधाने काही निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिषदेच्या समारोपानंतर पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्तांनी दिली. महिला-मुलींची विक्री तसेच शस्त्र तस्करीसंबंधाने माहिती देताना मकवाना यांनी चंबळपासून तो भोपाळपर्यंतच्या शस्त्रनिर्मिती आणि विक्रीसंबंधावर प्रकाश टाकला. तर सीसीटीएनएसमध्ये कशा अडचणी आहेत, त्यावर मार्ग काढण्यासाठी काय केले जात आहे, त्याबाबत संजीवकुमार सिंघल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
मानवी तस्करी गंभीर...
शस्त्र तस्करीचा मुद्दा यापूर्वी मध्यप्रदेशात पार पडलेल्या विविध राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या बैठकीतही गाजला. राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी तो उपस्थीत केला होता. त्यानंतर आम्ही विशेष मोहिम राबवून ५०० पेक्षा जास्त शस्त्रे जप्त केली होती. काही विशिष्ट जातीसमुदाय या शस्त्र बनविण्याच्या गोरखधंद्यात गुंतला असल्याचे मकवाना यांनी सांगितले. राज्यातील ५००० अल्पवयीन बेपत्ता आहेत. त्यातील तीन चतुर्थांश मुली असल्याचे सांगून त्यांना वाममार्गाला लावणा-यांचा या बेपत्ता प्रकरणात संबंध असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. नक्षलवादासंबंधाच्या सर्वच प्रश्नांना बगल देण्यात आली. तर, तोतलाडोहच्या मासेमारी करणारांच्या आडून नक्षलवादी सक्रीय झाल्याची माहिती आमच्याकडे आली होती, असे एका प्रश्नाच्या उत्तरात पोलीस उपमहानिरीक्षक पाटणकर यांनी सांगितले.
नागरिकांनो ई- तक्रारी करा..
राज्यात ई तक्रारीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत सिंघल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केली. आतापावेतो केवळ ३३० आॅनलाईन (ई) कम्प्लेंट आमच्याकडे आल्या आहेत. ई तक्रार करणे फारच सोपे आणि सोयीचे आहे. महाराष्ट पोलिसांच्या संकेतस्थळावर जाऊन आपला मेल आयडी तसेच मोबाईल क्रमांक नमूद करून रजिस्ट्रेशन करणा-या कोणत्याही व्यक्तीला कुठूनही ई तक्रार करता येते. अशी तक्रार करणा-याला तातडीने पोच मिळते. ठाणेदाराकडून नंतर मेसेज मिळतो आणि त्याची तक्रार ग्राह्य असल्यास त्याला ठाण्यात बोलवून त्यासंबंधाने कारवाईही निश्चितपणे केली जाऊ शकते. अनेक ठाण्यात प्रशिक्षीत मणूष्यबळ नसल्याने हा उपक्रम गुंडाळल्यासारखा झाल्याचे लक्षात आणून दिले असता त्यांनी ते मान्य केले. मात्र, लवकरच उपाययोजना करून ई तक्रारीचे प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न केले जातील, असे सिंघल म्हणाले. पोलीस ठाण्याचा कारभार ई तक्रारीच्या माध्यमातून पारदर्शी बनविता येईल, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी ई तक्रारी कराव्या, असे आवाहनही सिंघल यांनी केले. सीसीटीएनएसचे काम रेंगाळल्याच्या प्रश्नांवर त्यांनी तांत्रिक कारणांना पुढे केले.