लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेच्या पार्सलमधून आलेल्या ३३ लाख ४० हजार रुपयांच्या विदेशी सिगारेटच्या तस्करीचा भांडाफोड रेल्वे सुरक्षा दलाने केला. दरम्यान, जप्त केलेल्या सिगारेट राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोपविण्यात आल्या आहेत.
रेल्वे स्थानकावरील पार्सल विभागातून देशभरात कुठेही माल पाठविण्यात येतो. त्यासाठी पार्सलची नोंदणी, मालाचे वर्णन, माल कुठे पाठवायचा आणि इतर आवश्यक माहिती पार्सल विभागाला द्यावी लागते. विशाखापट्टणम येथे पाठविण्यात येणाऱ्या मालाच्या बाबतीत मात्र बुकिंग करताना चुकीची माहिती देण्यात आली होती. ठरलेल्या मार्गानुसार नागपूर रेल्वे स्थानकावर यातील ५ बॉक्स उतरविण्यात आले. येथून दुसऱ्या गाडीत हा माल विशाखापट्टणमला पाठविण्यात येणार होता. या वेळी प्लॅटफार्मवर गस्त घालत असलेले आरपीएफ जवान प्रवीण चव्हाण, राजेश गडपलवार यांचे लक्ष या बॉक्सवर गेले. त्यांनी चौकशी केल्यानंतर योग्य माहिती न मिळाल्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी आरपीएफचे निरीक्षक आर. एल. मीना यांना घटनास्थळी बोलावले. उपनिरीक्षक विनोद खरमाटे यांनी घटनास्थळ गाठून हे बॉक्स आरपीएफ ठाण्यात आणले. आरपीएफ ठाण्यात बॉक्स उघडल्यानंतर चार बॉक्समध्ये मॅनमारमध्ये निर्मित सिगारेट आढळल्या. या चार बॉक्समध्ये १९४ लहान बॉक्स होते. त्यात १ लाख ५८ हजार ८०० सिगारेट आढळल्या. दोन बॉक्समध्ये १२० सिगारेटच्या पाकिटात ९६ हजार सिगारेट आढळल्या. कागदोपत्री कारवाई करून रेल्वे सुरक्षा दलाने जप्त केलेल्या सिगारेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.