लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे तब्बल ८ महिन्यानंतर सिनेमागृहे १५ नोव्हेंबरपासून अनलॉक झाली. दिवाळीचा काळ असल्याने आणि लक्ष्मीपुजनानंतर दुसऱ्या दिवशी उसंत असल्याने काहीतरी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळतील, अशी आशा होती. मात्र, ही आशा फोल ठरल्याचे दिसून येत होते. एका अर्थाने सिनेमागृहे ‘अनलॉक’ झाली असली तरी प्रेक्षक मात्र ‘आऊट ऑफ रिच’ होते, अशी स्थिती आहे.
दिवाळी म्हटली की चित्रपट रसिकांचा सिनेमागृहांमध्ये जल्लोष बघणे उत्सुकतेचे असते. दिवाळीच्या मुहूर्ताला दरवर्षी बड्या बजेटचे, बड्या बॅनर्सचे सिनेमे प्रदर्शित होत असतात. यंदा मात्र, तशी स्थिती नाही. कोरोनामुळे मार्च महिन्यापासूनच सिनेमागृहे बंद पडली होती. त्यामुळे, प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या अनेक सिनेमे बारगळले. त्यातील काहींनी ओटीटीचा पर्याय निवडला. त्यामुळे सिंगल स्क्रीन थिएटर्स, मल्टिप्लेक्सचा व्यवसाय बसला आहे. या संकटातून जात असतानाच राज्य सरकारने ५ नोव्हेंबर रोजी सिनेमागृह उघडण्याचा निर्णय घेतला आणि सिनेमागृहांच्या मालकांमध्ये आनंद संचारला. १५ नोव्हेंबरपासून सर्व सिनेमागृहे प्रेक्षकांसाठी उघडण्यात आली. मात्र, अनेक चित्रपट तयार असतानाही निर्माते सध्याची स्थिती बघून चित्रपट प्रदर्शित करू इच्छित नसल्याने चित्रपटगृहांकडे प्रेक्षकांना दाखवायला जुनेच चित्रपट आहेत. त्यातच पहिला दिवस असल्याने आणि कोरोनाची धास्ती अजूनही असल्याने प्रेक्षकही चित्रपटगृहांकडे वळत नसल्याचे दिसून आले. शहरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये रविवारी ‘सुरज पर मंगल भारी’ या एकमेव नव्या प्रदर्शित चित्रपटाचे पोस्टर्स झळकले. हे पोस्टर्स बघण्यासाठी आणि अंदाज घेण्यासाठी अनेक तरुण मंडळी चित्रपटगृहांच्या घिरट्याही मारत होते. मात्र, ही उत्सुकता तिकिट खिडकीकडे वळत नव्हती, हे विशेष.
सकाळच्या शोला शुन्य प्रतिसाद
शहरातील सर्वच मल्टिप्लेक्समध्ये सकाळच्या शोला शुन्य प्रतिसाद दिसून आला. एकच चित्रपट असल्याने चित्रपटगृहांनी एकच स्क्रीन सुरू केली होती. मात्र, एक स्क्रीनही रिकामीच गेली. दुपारच्या शोला काही प्रेक्षक आले. मात्र, हा प्रतिसाद सुखावणारा नव्हता, अशी स्थिती होती.
हा महिना सुस्त जाण्याची शक्यता
आजच थिएटर्स सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी प्रेक्षक वळतील, अशी अपेक्षा तशीही नव्हतीच. शिवाय, जुनेच सिनेमे बघण्यास प्रेक्षक इच्छुक नसतात. या काळात रसिकांना एकापेक्षा दोन-तिन पर्याय हवे असतात. ही स्थिती संपूर्ण नोव्हेंबर महिना राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या शोला एकही प्रेक्षक नव्हता. दुपारी १ च्या शोला १२ आणि ३च्या शोला ८ प्रेक्षक होते. रात्री पुन्हा एकही प्रेक्षक वळला नाही.
- राजेश राऊत, सिनेमा मॅनेजर, कार्निव्हल सिनेमा