दुकानांमध्ये शिरले पाणी : बससेवा पूर्णपणे ठप्पनागपूर : गुरुवारच्या पावसामुळे सीताबर्डी भागाला सर्वात मोठा फटका बसला. संपूर्ण सीताबर्डीचा भाग जलमय झाला होता. झाशी राणी चौक, मुंजे चौक, महाराज बाग रस्ता, विदर्भ साहित्य संघासमोरील रस्त्यावर केवळ पाणीच पाणी दिसून येत होते. सीताबर्डी हे शहर बससेवेचे ‘जंक्शन’ मानण्यात येते. परंतु दुचाकी वाहने तर सोडाच, परंतु बसदेखील जाणे शक्य नसल्यामुळे जवळपास संपूर्ण नागपूरची बससेवा दुपारी १ वाजेपर्यंत ‘ब्लॉक’ झाली होती. यामुळे चाकरमान्यांचे, तसेच विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. दुकानांत पाणी, कोट्यवधींचे नुकसानसीताबर्डी भागात मोठ्या प्रमाणात दुकाने आहे. सीताबर्डी मुख्य बाजार, मोरभवन, महाराज बागेजवळील दुकाने, मुंजे चौक येथील दुकानांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. पाणी शिरल्याची माहिती कळताच दुकानदार लगबगीने दुकानांकडे धावून येत होते व हाती लागेल तेवढा माल हटविण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. झाशी राणी चौक, मोरभवनजवळील दुकानांचे तर सर्वाधिक नुकसान झाले. अ़नेक दुकानांमधील जोडे, चपला, छत्र्या अक्षरश: पाण्यात तरंगत होते. याशिवाय या भागात फर्निचरचीदेखील दुकाने आहेत. येथेदेखील पाणी शिरले होते. मोदी नंबर १ व २ मधील पहिल्या मजल्यावरील दुकानांत तर चक्क ४ फूट पाणी शिरल्याचे दिसून आले. वाहनांच्या रांगारस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने अडकून पडली होती. पाणी शिरल्यामुळे वाहने सुरूच होत नसल्याने वाहनचालकांची अडचण झाली. अनेक रस्त्यांवर वाहनांची रांग लागलेली दिसून आली. दरम्यान, रस्त्यांवरून चालणे शक्य नसल्याने नागरिकांना रस्ता दुभाजकावरूनच चालावे लागले. अनेक ठिकाणी दुभाजकदेखील पाण्यातच होते.सिनेमागृहात शिरले पाणीसीताबर्डी भागात पाण्याचा प्रवाह जोरदार होता. मुंजे चौकाकडून येणारे पाणी जानकी चित्रपटगृहाच्या बाजूच्या गल्लीतून नागनदीकडे चालले होते. बरेचसे पाणी हे जानकी चित्रपटगृहाच्या प्रांगणात जमले होते व त्याला डबक्याचे स्वरूप आले होते. ‘लोकमत’ चमूने सिनेमागृहाची पाहणी केली असता आतमध्येदेखील पाणी साचले होते. रिझर्व्हमधील सर्व खुर्च्या पाण्यात होत्या.ना प्रशासन, ना पोलीससीताबर्डी परिसरात सकाळपासूनच प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. परंतु नागरिकांच्या मदतीसाठी किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन किंवा पोलीस दलातील एकही कर्मचारी नव्हता. सकाळी १० च्या सुमारास दोन वाहतूक पोलीस झाशी राणी चौकात पोहोचले.बससेवा ठप्पसीताबर्डी परिसरात सकाळच्या सुमारास कार्यालयात जाणारे तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. शहरातील विविध भागांतून येथे बसेस येतात. परंतु सर्वच रस्त्यांवर पाणी साचले असल्याने बस जाणे कठीण होत होते. काही ‘स्टार’ बसचालकांनी पाण्यात बस टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही व रस्त्यातच बसेस बंद पडल्याचे दिसून आले. त्यामुळे आत बसलेल्या प्रवाशांचे हाल झाले. अखेर नाईलाजाने कंबरेइतक्या पाण्यात उतरण्याखेरीज त्यांच्याकडे कुठलाही पर्याय उरला नाही. बससेवा ठप्प झाल्याने पुढे जायचे कसे, हा प्रश्न नागरिकांसमोर होता. आॅटोचालक फारसे दिसून आले नाहीत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.मोरभवनमध्ये तर प्रवासी थांबे पाण्यामध्ये अर्ध्याहून अधिक बुडाले होते.प्राण वाचविण्यासाठी डुकरांची धडपडमोरभवनच्या बाजूने नागनदी वाहते. या पाण्याचा प्रवाह सुरक्षाभिंत ओलांडून वाहत होता व सर्व पाणी रस्त्यावरच येत होते. बाजूच्या मंदिरात पाणी शिरले होते. नागनदीच्या पाण्यात डुकरे वाहून आली होती व एका झाडाला अडकून बसली होती. पाण्याची पातळी वाढतच असल्याने प्राण वाचविण्यासाठी या डुकरांची धडपड सुरू होती. पाण्याच्या प्रवाहाचा वेग पाहता त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणे शक्य नव्हते. दरम्यान नागनदीच्या प्रवाहातून सीताबर्डीच्या रस्त्यावर दोन साप आल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.काछीपुऱ्यातील वस्त्यांमध्ये शिरले पाणीकाछीपुरा भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले. बजाजनगरकडून येणाऱ्या मुख्य मार्गावर दोन्ही बाजूंनी पाणी साचले होते. त्यामुळे वाहने अडकून पडत होती. या वस्तीतील अनेक ठेले पाण्यात गेले होते. शिवाय घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने घराबाहेर उभे राहणे भाग पडले.गोपालनगरात रस्त्यांवर गडरचे पाणीगोपालनगर परिसरात गडरलाईनची कधीच नियमितपणे स्वच्छता होत नाही. वारंवार तक्रारी करूनदेखील प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाचा फटका गुरुवारी बसला. अनेक वस्त्यांमध्ये गडरलाईन चोक झाल्यामुळे रस्त्यांवर सांडपाणी वाहत होते. शिवाय सखल भागात पाणी भरल्यामुळे काही घरांतदेखील पाणी शिरले होते. पडोळेनगर चौकात पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.रामदासपेठच्या ‘पॉश’ वस्तीत पाणीरामदासपेठ ही शहरातील ‘पॉश’ वस्ती समजण्यात येते. परंतु येथेदेखील मुसळधार पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले. सेंट्रल बाजार मार्ग तसेच पंचशील चौकाकडून रामदासपेठकडे येणाऱ्या मार्गावर पाणीच पाणी असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता.‘सेल्फी’ची डोकेदुखीएकीकडे पावसामुळे नागरिक हवालदिल झाले असताना अनेक अतिउत्साही तरुणांना मात्र त्याचे काहीही सोयरसुतक नव्हते. शहरातील पाणी भरलेल्या विविध ठिकाणी जाऊन हे तरुण ‘सेल्फी’ घेताना दिसत होते. ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मदत करण्याचे सोडून हे युवक ‘सेल्फी’साठी वाट्टेल ते करत होते. शिवाय एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे, दगड फेकून मारणे यासारख्या प्रकारांमुळे नागरिकांना त्रास होत होता. ‘सेल्फी’ काढण्याच्या नादात वाहतुकीची कोंडीदेखील होत होती. विशेषत: सीताबर्डी उड्डाण पुलावर हे चित्र दिसून आले.
सीताबर्डी ‘ब्लॉक’
By admin | Published: August 14, 2015 3:05 AM