नागपूर : सुरेंद्रगढ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून गडर व सिवर लाइनची झाकणे तुटलेली आहेत. मानवसेवानगर व गौरखेडे काॅम्प्लेक्स परिसरात हीच अवस्था आहे. गडरच्या तुटलेल्या झाकणांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून अपघाताचा धोका वाढला आहे. वारंवार तक्रारी करूनही नगरसेवक या समस्येकडे कानाडोळा करीत हाेते. त्यामुळे नागरिक हतबल झाले होते. अशा वेळी नागरिकांनीच पुढाकार घेत लाेकवर्गणी गाेळा करून गडरची झाकणे आणली आणि बसविली. निष्क्रिय नगरसेवकांना नागरिकांनीच आरसा दाखविला, अशी चर्चा सुरू आहे. सुरेंद्रगढ प्रभागात हरीश ग्वालबंशी, विक्रम ग्वालबंशी, मायाताई इवनाते व दर्शनी धवड प्रतिनिधित्व करतात. प्रभागाचा विस्तार मोठा असल्याने कामे करण्यासाठी सगळेच नगरसेवक टाळाटाळ करतात. जनहित या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अभिजित झा यांच्या नेतृत्वात या उपक्रमासाठी पुढाकार घेण्यात आला. पहिल्याच दिवशी तब्बल १५ झाकणे बदलण्यात आली. यावेळी प्रवीण बैरागी, प्रतीक बैरागी, राकेश तिवारी, नरेश वैष्णव, सतीश मिश्र, शुभम मिश्रा, राहुल तिवारी, अनुराग मिश्रा, संतोष चौबे, चंद्रकांत हेडाऊ, शैलेश बंसोड, आदी उपस्थित होते.
नागरिकांनी लोकवर्गणीतून बदलली गडरची झाकणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:07 AM