नागपूर : नागपूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत आहे. शहरातील नागरिकांसाठी मेट्रो रेल्वे सुरु झाली आहे. परंतु उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये आजही नागरिकांना मूलभुत सुविधांसाठी धडपड करावी लागत आहे. ‘लोकमत’ने उत्तर नागपुरातील चॉक्स व लघुवेतन कॉलनीची पाहणी केली असता या भागातील नागरिकांनी समस्यांचा पाढाच `लोकमत’च्या चमूसमोर वाचला.
इंदोरा मैदानात अतिक्रमण
उत्तर नागपुरातील इंदोरा मैदानात सगळीकडे अतिक्रमण करण्यात आले आहे. मैदानाच्या चारही बाजुूनी कचरा साचलेला दिसतो. लघुशंकेसाठी नागरिक या मैदानाचा वापर करीत असल्यामुळे मैदानात सगळीकडे दुर्गंधी पसरल्याचे चित्र दिसते. मैदानात असामाजिक तत्त्वांचा वावर राहतो. ते मैदानात मद्य प्राशन करणे, दारुच्या बॉटल्स फोडणे असे कृत्य करतात. यामुळे मैदानाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मैदानाच्या विकासाकडे लक्ष पुरविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
चॉक्स कॉलनीत गडरलाईनचे पाणी घरात
चॉक्स कॉलनीत गडरलाईनचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. या भागात ६० वर्षांपुर्वी गडरलाईन टाकलेली आहे. परंतु या भागात नागरिकांची संख्या वाढल्यामुळे ही गडरलाईन नेहमीच चोक होते. नागरिकांच्या घरात गडरलाईनचे पाणी शिरते. अनेक नागरिक गडरलाईनचे झाकण उघडून त्यात कचरा टाकत असल्यामुळे गडरलाईन नेहमीच चोक होते. त्यामुळे गडरलाईनची समस्या दूर करण्याची मागणी होत आहे. याशिवाय या परिसरात सफाई कर्मचारी नियमित येत नाहीत. जागोजागी कचरा साचलेला दिसतो.
लघुवेतन कॉलनीत गार्डनची दुरवस्था
लघुवेतन कॉलनीत गार्डन आहे. परंतु या गार्डनची दुरवस्था झाली आहे. येथे गार्ड राहत नसल्यामुळे गार्डनमध्ये असामाजिक तत्त्वांचा वावर राहतो. हे असामाजिक तत्त्व शिवीगाळ करणे, जुगार खेळणे, मद्य प्राशन करणे असे प्रकार गार्डनमध्ये करीत असल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना मनस्ताप होत आहे. तक्रारी करूनही कारवाई करण्यात येत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गार्डनमधील खेळणी तुटलेली आहेत. त्यामुळे गार्डनची योग्य देखभाल करण्याची गरज आहे. या भागात स्पिड ब्रेकर नसल्यामुळे वाहनचालक वेगात वाहने चालवितात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या भागातही गडरलाईनवर नागरिकांनी घरे बांधल्यामुळे गडरलाईनची देखभाल होत नाही. नळाला कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.
उद्यानाची नियमित देखभाल व्हावी
‘लघु वेतन कॉलनीतील गार्डनची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे. येथे येणाऱ्या असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्यासाठी या भागात नियमित पोलिसांची गस्त वाढविणे आवश्यक आहे. याशिवाय गार्डनमधील तुटलेली खेळणी दुरुस्त करण्याची गरज आहे.’
-अशोक मोटघरे, नागरिक
स्पीड ब्रेकरची गरज
‘परिसरात स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहनचालक वेगात वाहने चालवितात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या भागात स्पीड ब्रेकर लावण्याची गरज आहे.’
-शिवलाल हळदे, नागरिक
इंदोरा मैदानाचा विकास करावा
‘इंदोरा मैदानाचा विकास करण्याची गरज आहे. मैदानात सगळीकडे कचरा साचलेला राहतो. असामाजिक तत्त्वही मैदानात जमा होतात. मैदानात वॉकिंग ट्रॅक तयार करण्याची गरज आहे.’
-सूरज कांबळे, नागरिक
मैदानातील अतिक्रमण हटवावे
‘चॉक्स कॉलनी परिसरातील इंदोरा मैदानात चारही बाजूनी अतिक्रमण झाले आहे. मैदानात गिट्टी, रेतीचे ढीग साचलेले दिसतात. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून मैदानाच्या विकासाकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे.’
-स्वप्निल सूर्यवंशी, नागरिक
गडरलाईनची समस्या दूर करावी
‘चॉक्स कॉलनीत गडरलाईनचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांना घरात राहणे कठीण झाले आहे. या भागातील गडरलाईन बदलून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.’
-अनुराधा भैसारे, महिला
नियमित सफाई व्हावी
-कचरा उचलणारी गाडी नियमित येत नसल्यामुळे लघुवेतन कॉलनी परिसरात सगळीकडे कचरा साचलेला दिसतो. त्यामुळे या भागात नियमित कचरागाडी पाठविण्याची व्यवस्था महापालिकेने करणे आवश्यक आहे.’
-राजेश वनकर, नागरिक
.................