नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराच्या विविध भागात मोठमोठ्या वस्त्या तयार होत आहेत. तेथे सोयीसुविधा पुरविण्यात येत आहेत. परंतु दक्षिण नागपुरातील नरसाळा भागातील समाधान नगरातील नागरिक विकासापासून कोसोदूर आहेत. त्यांना रस्ते, गडरलाईनमुळे त्रास होत आहे. आपल्या समस्या सोडविण्याची मागणी ते महापालिकेकडे करीत आहेत.
गडरलाईनमुळे नागरिक त्रस्त
समाधाननगरात गडरलाईन नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. नागरिकांच्या सेफ्टी टँंकचे पाणी विहिरीत शिरत आहे. त्यामुळे विहिरी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सेफ्टी टँकचे पाणी इतरत्र वाहत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडत आहे. महानगरपालिकेने या भागात गडरलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. या भागात अनेक रिकामे प्लॉट आहेत. या रिकाम्या प्लॉटवर पाणी साचते. तसेच प्लॉटवर झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे या रिकाम्या प्लॉट धारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.
रस्त्यांची वाईट अवस्था
समाधाननगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी गिट्टी उखडुन रस्त्यावर पसरली आहे. वाहन चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यांसाठी नागरिकांनी अनेकवेळा निवेदने दिलीत. परंतु त्यावर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. पावसाळ्यात रस्त्यावरून चालणेही कठीण होत आहे. त्यामुळे महापालिकेने या भागात डांबरीकरण करण्याची नागरिकांची मागणी आहे.
अपार्टमेंटची गडरलाईन समाधाननगरात
समाधाननगरच्या बाजूलाच अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटची गडरलाईन समाधाननगरच्या शेजारी आणून सोडण्यात आली आहे. समाधाननगरात एक पांदण रस्ता आहे. या रस्त्याचा आता नाला झाला आहे. या नाल्यात पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नाल्यात डासांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळेही नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पांदण रस्ता तयार करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
रस्त्यांचे डांबरीकरण करावे
‘रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. महापालिकेने या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची गरज आहे.’
-रमेश गायकवाड, नागरिक
गडरलाईनची सुविधा हवी
‘समाधाननगर परिसरात मागील अनेक वर्षांपासून नागरिक गडरलाईनची मागणी करीत आहेत. गडरलाईन नसल्यामुळे सेफ्टी टँकचे पाणी विहिरीत जाऊन विहिरी दूषित होत आहेत. त्यामुळे गडरलाईनची सुविधा उपलब्ध करून द्यावी.’
-गीता बेंद्रे, महिला
रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करावी
‘अनेक नागरिकांनी रिकामे प्लॉट घेऊन ठेवले आहेत. या रिकाम्या प्लॉटमध्ये झाडे वाढली असून पाणी साचते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे. महापालिकेने या रिकाम्या प्लॉटधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.’
-अल्का सोनारे, महिला
पांदण रस्ता दुरुस्त करावा
‘समाधाननगरच्या बाजूलाच पांदण रस्ता आहे. या रस्त्याचा नाला झाला असून त्यात घाण पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना डासांचा त्रास होऊन दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे पांदण रस्ता तयार करण्याची गरज आहे.’
-कविता हटवार, महिला
नियमित फवारणी व्हावी
‘पांदण रस्त्याचा नाला झाल्यामुळे या भागात खूप दुर्गंधी पसरते. डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे महापालिकेने या भागात नियमित फवारणी करण्याची गरज आहे.’
-ज्ञानेश्वर चरडे, नागरिक
लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम
‘बाजूला असलेल्या अपार्टमेंटची गडरलाईन समाधाननगरच्या शेजारी आणून सोडण्यात आली आहे. त्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. महापालिकेने त्वरीत यावर तोडगा काढून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.’
-सुषमा नागपुरे, महिला
........