लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : भंडारा जिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात रेती आणली जाते. यातील काही वाहनातील रेती विना राॅयल्टी तर काहींमधील रेती ही ओव्हरलाेड असते. पाेलिसांच्या भीतीपाेटी एका ट्रकचालकाने बाेरगाव (ता. माैदा) परिसरात राेडलगत ट्रकमधील रेती टाकून पळ काढला. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी मिळेल त्या साधनाने ती रेती लंपास करायला सुरुवात केली.
वैनगंगा नदीतील तांबड्या रेतीला बाजारात भरीव मागणी असल्याने भंडारा जिल्ह्यातून राेज शेकडाे ट्रक व टिप्पर रेती नागपूर जिल्ह्यात आणली जाते. या रेतीची वैध व अवैध वाहतूक ही बाेरगाव, माैदा मार्गे नागपूरच्या दिशेने केली जाते. रेतीची वाहतूक मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सुरू असते. शनिवारी (दि. २४) पहाटेच्या सुमारास काही ट्रक व टिप्पर रेती घेेऊन नागपूरच्या दिशेने जात असतानाच पुढे पाेलीस असल्याची माहिती ट्रकचालकास मिळाली.
पाेलीस कारवाईच्या भीतीपाेटी ट्रकचालकाने त्याच्या मालकाच्या सांगण्यावरून ट्रकमधील रेती बाेरगावजवळ राेडलगत टाकली आणि रिकामा ट्रक घेऊन निघून गेला. सकाळी ती रेती स्थानिक नागरिकांच्या नजरेत पडली. ती चाेरीची असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या रेतीवर डल्ला मारायला सुरुवात केली. कुणी ती रेती पाेत्यात भरून नेली तर कुणी घमेले व इतर साधनांचा वापर केला.
...
पायलट वाहन व पाेलीस कारवाई
रेतीची वाहतूक करणारी वाहने गटागटाने निघतात. त्या वाहनासमाेर रेती तस्कराचे एक पायलट वाहन असते. त्या वाहनातील व्यक्ती रेतीच्या वाहनावरील चालकांना पाेलिसांच्या हालचालींची इत्थंभूत माहिती वेळावेळी देते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. २४) पहाटे नागपूर-भंडारा मार्गावरील माथनी शिवारात रेतीची ओव्हरलाेड वाहतूक करणारे सात टिप्पर पकडले. पायलट वाहनातील व्यक्तींनी या पाेलीस कारवाईची माहिती लगेच मागे असलेल्या ट्रकचालकांना दिली. त्यातील एका चालकाने त्याच्या ट्रकमधील रेती बाेरगाव परिसरात टाकली आणि पळ काढला.