लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने बाहेर जाण्यासाठी आवश्यक असलेल्या पोलीस पास मिळवण्यासाठी शहरातील ३० ही पोलीस ठाण्यात दिवसभर वर्दळ राहिली. मात्र, पोलिसांनी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेत, अत्यावश्यक काम जाणून घेत रात्रीपर्यंत ३,८४९ पासेसचे वितरण केले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात लॉकडाऊन आणि सोमवारपासून संचारबंदी करण्यात आली. या संचारबंदीचे काही जण सर्रास उल्लंघन करीत असल्याचे सोमवारी दुपारी लक्षात आल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले. त्यामुळे सायंकाळपर्यंत संचारबंदीचा प्रभाव शहरभर जाणवला. दरम्यान, हीच स्थिती राहावी, कुणीही रिकामटेकडे, उपद्रवी, उत्साही मंडळी घराबाहेर पडू नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पोलिसांनी अत्यावश्यक कामाच्या निमित्तानेच घराबाहेर जाण्याची नागरिकांना सूचना केली. त्यासाठी आवश्यक असलेल्या पासेस (परवानगीपत्र) पोलीस ठाण्यातून तुम्हाला देण्यात येईल, असेही जाहीर केले. तशी व्यवस्थाही सर्व पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यामुळे अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने घराबाहेर जाणाऱ्या मंडळींनी पोलीस ठाण्यात सकाळपासूनच गर्दी केली. पोलिसांनीही त्यांची अत्यावश्यक कारणे जाणून घेतल्यानंतरच त्यांना या पासेसचे वितरण केले. मंगळवारी रात्री ७ वाजेपर्यंत शहर पोलीस ठाण्यातून एकूण ३,८४९ पासेसचे वितरण करण्यात आले होते.अशा होत्या अटीही पास फक्त एकाच कामाच्या निमित्ताने एकाच दिवसांसाठी मिळणार होती. संबंधित व्यक्तीने त्याला कोणत्या कामाच्या निमित्ताने, कुठे जायचे आहे, त्याची माहिती पोलिसांना आधी द्यावी लागत होती. ती माहिती खरी आहे की नाही, त्याची शहानिशा केल्यानंतरच पोलीसही पास देत होते. एखाद्या व्यक्तीला बाहेरगावी रुग्णाला भेटण्यासाठी जायचे आहे किंवा तो नागपुरातच अडकून पडला आणि आता त्याला दुसऱ्या जिल्ह्यात बाहेरगावी जायचे आहे, अशांना खातरजमा करून पोलीस परवानगीची पास देत होते.
अन् तो पोहचला गडचिरोलीला !मूळचा गडचिरोली येथील एक उच्चशिक्षित तरुण गुजरातमधील अहमदाबादला सेवारत आहे. कोरोनाने सर्वत्र दहशत निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर, तो आपल्या गावाला परतण्यासाठी निघाला. मंगळवारी भल्या सकाळी तो नागपूर विमानतळावर आला. येथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कोरोनाबाबत कसलाही संशय नसल्याने त्याला विमानतळावरून सोडण्यात आले. तो विमानतळावर बाहेर आला. मात्र, जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्याने आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायला पोलीस परवानगी पास आवश्यक असल्याने तो येथे अडकून पडला. लोकमतचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे यांनी त्याची अडचण लक्षात घेऊन ती नागपूरच्या लोकमत प्रतिनिधींना कळविली. तरुणाला गडचिरोलीला जाणे आवश्यक असल्याचे लक्षात घेत परिमंडळ एकचे उपायुक्त विवेक मासाळ यांनी लगेच सोेनेगाव पोलिसांना सूचना केली. त्यांनी आवश्यक तो अर्ज भरून घेतल्यानंतर त्याला परवानगी पास दिला अन् दुपारी तो तरुण गडचिरोलीला त्याच्या घरी सुखरूप पोहचला. पोलिसांची अशीही गांधीगिरी !विनंती, सूचना, आवाहन आणि काही ठिकाणी सुताई करूनही अनेकांनी संचारबंदीत बाहेर निघण्याचा मोह टाळला नाही. त्यात तरुण-तरुणींसोबत प्रौढ मंडळींचाही सहभाग होता. अशांसोबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अनोखी गांधीगिरी करून घेतली. संचारबंदीला न जुमानता घराबाहेर फिरणाऱ्या व्यक्तीसमोर पोलिसांनी विविध फलक धरुन फोटो काढून घेतले. त्यात ‘मी माणूसच आहे, मला घराबाहेर पडायचेच आहे. मी घरीच थांबायला पाहिजे होते, कोरोना प्रादुर्भाव’, असे हे फलक होते. पोलिसांची ही गांधीगिरी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेला आली होती.