लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : काेराेनाचा पुन्हा वाढता संसर्ग लक्षात घेता शहर व ग्रामीण भागात जनजागृती तसेच दंडात्मक कारवाई हाेणे आवश्यक आहे. जेणेकरून नागरिकांमध्ये काेराेना संसर्गजन्य महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाची जाणीव हाेईल. खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येकांनी मास्कचा वापरणे, शारीरिक अंतर ठेवणे, लक्षणे आढळल्यास काेराेना तपासणी करून घेणे, या सर्व बाबींची अंमलबजावणी केली जाईल. काेराेना नियंत्रणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार सुजाता गावंडे यांनी केले.
कोविड-१९ बाबत प्रतिबंधात्मक उपाययाेजना व कारवाईसंदर्भात पोलीस यंत्रणा, पंचायत समिती, नगर परिषद व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची प्रभारी तहसीलदार सुजाता गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली कळमेश्वर तहसील कार्यालयात सभा पार पडली. या सभेत विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. प्रीती इंगळे, मुख्याधिकारी स्मिता काळे उपस्थित होत्या.
पंचायत समिती, नगर परिषद विभागाला दंडात्मक कारवाई करताना पाेलीस यंत्रणा सहकार्य करेल. कोरोनाबाधित रुग्णाच्या घराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून तयार केल्यानंतर या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवासी क्षेत्राबाहेर येणे-जाणे करणार नाही. तसेच तालुक्यातील रहिवासी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर तसेच शारीरिक अंतर पाळतील अन्यथा प्रत्येकी ५०० रुपये अशी दंडात्मक कारवाई केली जाईल. सोबतच तालुक्यातील आठवडी बाजारातील भाजी विक्रेता, किराणा दुकानदार, किरकाेळ विक्रेते, रिक्षाचालक, औषधी विक्रेता, हॉटेल्स, धाबा, सलूनधारक, कारखाने कर्मचारी व कामगार तसेच वसतिगृह, शाळांचे विद्यार्थी आदींनी कोरोना चाचणी करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे आवाहनही गावंडे यांनी यावेळी केले.
तालुक्यातील मंगल कार्यालय, लॉन्स, धार्मिक स्थळे व इतर कार्यक्रमस्थळी कार्यक्रमाचे तसेच इतर वेळीही मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. या सभेला तालुक्यातील प्रतिष्ठानाचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.