लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमावलीचे पालन करीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले.
तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे शासनाच्या निदर्शनास येताच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत तहसीलदार अरविंद हिंगे यांनी बाजार परिसर, बसस्थानक, ऑटाे स्टँड, रेल्वे स्टेशन, विविध शासकीय कार्यालये तसेच रस्त्याने वाहतूक करणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी तोंडावर मास्क बांधल्याशिवाय शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेही फिरू नये, सोबतच सॅनिटायझरचा वापर करावा, कोणत्याही ठिकाणी गर्दी दिसून येणार नाही, याकरिता संबंधित अधिकारी व पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. बैठकीला नवीन कामठी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, जुनी कामठीचे दुय्यम पोलीस निरीक्षक युनूस शेख, एस. आर. पाटील, नायब तहसीलदार रणजित दुसावार, सुनील तरोडकर, आर. टी. उके, नगर परिषद नागरी सुविधा केंद्राच्या डॉ. शबनम खानुनी, अमोल पोळ, शेख शरीफ यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.