नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरालगतच्या भागात डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे डेंग्यू रुग्ण संख्येत वाढ होऊन डेंग्यू उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डेंग्यू नियंत्रणासाठी घरातच व परिसरात डासअळी उत्पत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जनतेने घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले आहे.
सद्यस्थितीत डेंग्यू आजाराचे नागपूर ग्रामीण भागात २४१ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण गंभीर नसून सर्व रुग्णांची प्रकृती ठिक आहे. डेंग्यू आजाराचा लक्षणे आढळून आल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोगय केंद्रात संपर्क साधाव डेंग्यूचा प्रसार होऊ नये यासाठी आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी कोरडी करावी. पाणी साठविलेली भांडी व्यवस्थित झाकून ठेवावी. घराभोवतालची व छतावर वापरात नसलेले टाकाऊ साहित्य ठेऊ नये व त्याची योग्य विल्हेवाट लावावी. गावाचा परिसर स्वच्छ ठेवावा. आठवडी बाजार व यात्रेच्या ठिकाणी साचलेला कचरा घाण याची त्वरित विल्हेवाट लावावी. यात्रेबाबत माहिती नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला द्यावी.
गावातील शेणाचे ढिगार घरापासून व लोक वस्ती पासून दूर ठेवावे. गावात गप्पी मासे पैदास केंद्राची निर्मिती करुन घरगुती पाणी साठे व कायम स्वरुपी डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडावे. गावात ताप रुग्ण आढळल्यास आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका अथवा आशाद्वारे रक्त नमूना घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करीता पाठवावे किंवा रुग्णाला नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठवावे. पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये डासअळी नियंत्रणाविषयी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे.