नागपूर : शहरात चांगल्या सुविधा निर्माण करून विकास करण्यासाठी नागरिकांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कर वसुली महापालिकेतर्फे केली जाते. वेतन, पेन्शनवर ३० कोटी रुपयांच्या जवळपास खर्च होत आहे. यात विविध प्रकारच्या भत्त्यांचाही समावेश आहे. अलीकडे मोबाईलचा वापर वाढला आहे. अशापरिस्थितीत मनपाचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलचा खर्चसुद्धा जनतेच्या पैशातून केला जात आहे. मोबाईल सेवेचा वार्षिक खर्च ४० लाख रुपयांच्या जवळपास आहे. मोबाईल सेवेसाठी नवीन निविदा काढण्याच्या प्रस्तावाला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली. मनपा प्रशासनाने म्हणणे आहे की, कार्यालयीन कामकाजाला गती प्रदान करण्यासाठी आणि चांगला संवाद प्रस्थापित व्हावा यासाठी मोबाईल सेवा प्रदान केली जात आहे. यात अधिकारी, पदाधिकारी व आवश्यक सेवेचा कर्मचाऱ्यांना मोबाईलचा भत्ता दिला जातो. सध्या एअरटेल कंपनीची सेवा घेतली जात आहे. संबंधित कंपनीच्या सेवेचा कार्यकाळ १४ जानेवारी रोजी संपणार आहे. नवीन निविदा काढण्यासाठी महिना लागू शकतो. त्यामुळे एअरटेल कंपनीच्या सेवेचा कालावधी एक महिन्याने पुन्हा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोबाईलवर नागरिकांचे ४० लाख रुपये खर्च
By admin | Published: December 29, 2015 8:01 PM