लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शहरातील वाॅर्ड क्रमांक २ व ३ हे रेल्वेस्थानक परिसरात आहेत. या भागातील सांडपाण्याच्या नाल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित असून, त्यातील पाण्याची दुर्गंधी येते. त्यामुळे नागरिकांना माेकळा श्वास घेणे मुश्कील झाले असून, त्यांच्या आराेग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही समस्या साेडविण्यासाठी स्थानिक नगरपरिषद प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली. मात्र, प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघितले नाही, असा आराेप या दाेन्ही वाॅर्डमधील नागरिकांनी केला आहे.
या दाेन्ही वाॅर्डमधील गवळीपुरा भागातील सांडपाण्याच्या नाल्यांची अवस्था फारच दयनीय झाली आहे. या नालीतून रेल्वेस्थानकासाेबतच नागरिकांच्या घरांमधील सांडपाणी वाहते. या नाल्यांची नियमित साफसफाई केली जात नसल्याने त्या बुजल्यागत झाल्या आहेत. त्यामुळे नालीच्या काही भागातून सांडपाणी बाहेर येत असल्याने ते राेडवरून वाहते, तर काही भागात ते नालीतच तुंबले आहे. त्यात पडलेला कचरा सडल्याने नालीतील सांडपाण्याची दुर्गंधी सुटली आहे.
काही ठिकाणी या नालीवर अतिक्रमणे देखील करण्यात आली आहेत. त्यामुळे नालीतील सांडपाण्याला अवराेध निर्माण झाला आहे. ही नाली नागरिकांच्या घराजवळून गेली आहे. नालीतील पाण्याची दुर्गंधी, त्यातील किटाणू व डासांमुळे नागरिकांना एकीकडे श्वास घेणे कठीण झाले असून, दुसरीकडे त्यांना मलेरिया, फायलेरिया, डेंग्यू, टायफाईड व तत्सम कीटकजन्य आजार हाेण्याची शक्यता बळावल्याने त्यांचे व मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे.
ही समस्या साेडविण्यासाठी स्थानिक नगरपरिषद प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली. मात्र, प्रशासनाने या मागणीवर गांभीर्याने विचार केला नाही. प्रशासनाने या नालीची याेग्य साफसफाई करून दुरुस्ती करावी, अशी मागणी या दाेन्ही वाॅर्डमधील नागरिकांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.