नागपूर : शहराच्या काही भागात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. याचे पडसाद सोमवारी महापालिका मुख्यालयात आयोजित समस्या व तक्रारीवरील सुनावणीत उमटले. वांजरा, पांजरा व कळमना भागातील तसेच उत्तर नागपुरातील नागरिकांनी पाणीटंचाई व अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करून यातून सुटका करण्याची मागणी केली. तर उत्तर नागपुरातील रखडलेल्या पाईप लाईनचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
नागरिकांच्या विविध विषयांच्या अनुषंगाने प्राप्त तक्रांरीवर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुनावणी घेतली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी आर. विमला, नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन यांच्यासह रेल्वे, जिल्हाधिकारी कार्यालय व नासुप्रचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. सुबोध नंदागवळी व बालमुकुंद जनबंधू यांनी वांजरा, पांजरा आणि कळमना येथे नळजोडणी देण्याची मागणी केली. सुरेश पाटील, सतीश पाली, मनोज सांगोळे, राकेश निकोसे यांनी उत्तर नागपुरातील पाणीटंचाईची समस्या मांडली. यावर नितीन राऊत यांनी मनपा आणि नासुप्रला समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.
भांडेवाडी येथे इसाई धर्मीयांसाठी दफनभूमीची मागणी ॲड. विपीन बाबर आणि फादर जोसेफ बाबर यांनी केली. संपूर्ण इसाई धर्मीयांसाठी दफनभूमी असावी, यादृष्टीने जागा देण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. मनपाद्वारे इसाई धर्मीयांना अटी आणि शर्तीच्या अधीन राहून जागेचे पालकत्व देण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
मोमिनपुरा येथील मुस्लीम लायब्ररीच्यासंदर्भात नुरूल हक आणि असलम मुल्ला खान यांनी समस्या मांडली. लीज नूतनीकरण करण्याची मागणी केली. मुस्लीम लायब्ररीचा ताबा मनपाने स्वत:कडे घेउन अन्य अतिक्रमण हटवून या जागेवर सुरक्षा भिंत बांधण्याचे निर्देश नितीन राऊत यांनी मनपाला दिले.
रेल्वेच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करा
भीमनगर झोपडपट्टी व जुना जरिपटका रेल्वे लाईनच्या बाजूला मागील ६० वर्षांपासून वसलेल्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी विनोद सोनकर, सुरेश जग्यासी, नेपाल शाह आणि विकास गौर यांनी केली. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचे नितीन राऊत म्हणाले.