नागपूर : अजनी अंतर्गत कुकडे ले-आऊट व जाेशीवाडी परिसरातील नागरिकांना गेल्या दाेन वर्षापासून कचऱ्याच्या समस्येला ताेंड द्यावे लागत आहे. कंपनीचे कचरा संकलन कर्मचारी दरराेज कचरा गाेळा करण्यास येत नाही. आले त्यावेळी गल्लीतून घरापर्यंत न जाता चाैकात कुठेतरी उभे राहतात. त्यामुळे माहिती न पडल्याने अनेकांच्या घरचा कचरा पडून राहताे. कंपनीच्या कचरा संकलन कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
स्थानिक नागरिकांच्यावतीने सम्राट अशाेक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने मनपाचे नाेडल अधिकारी डाॅ. प्रदीप दासरवार यांना निवेदन देण्यात आले आहे. संस्थेचे अनिकेत कुत्तरमारे यांनी सांगितले, कचरा संकलन करणारे कर्मचारी दाेनदाेन दिवस कचरा घेण्यास येत नाही. आल्यावर गल्ल्यांमधून घरापर्यंत न येता चाैकात कुठेतरी उभे राहतात. नागरिकांना माहीतही हाेत नाही आणि निघून जातात. त्यामुळे घरातील कचरा तसाच पडून राहताे. याबाबत बाेलले असता अरेरावी केली जाते. अनेकदा तक्रारी करूनही मनपाकडून दखल घेतली जात नसल्याचे अनिकेतने सांगितले. अनेक महिन्यांपासून ही समस्या आहे. त्यामुळे लाेकांना सेवा मिळत नसेल तर नागरिकांचा दाेन वर्षाचा कर माफ करून कंपनीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कर्मचारी कचरा संकलन करण्यास कुचराई करीत राहिल्यास कुठेही कचरा फेकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.