भिवापूर : गत महिनाभरापासून माकडांच्या उच्छादामुळे शहरातील नागरिक त्रस्त असून लहान मुलेसुद्धा भयभीत आहेत. माकडांचा हा कळप घरादारांसह छतावरील साहित्याचेसुद्धा नुकसान करत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दररोज सकाळच्या सुमारास अंदाजे ५० ते ६० माकडांचा समूह शहरातील विविध भागात उपद्व्याप घालतात. माकडांचा हा उपद्व्यापी कार्यक्रम दुपारपर्यंत सुरू असतो. परिसरातील पाण्याच्या टाकीवर किंवा एखाद्या झाडावर ही माकडे रात्री मुक्काम ठोकतात. परत सकाळ झाली की, त्यांचा उपद्व्याप सुरू होता. यात कच्च्या घरांचे, टिन किंवा कवेलूच्या छताचे मोठे नुकसान होत आहे. छतावर वाळू घातलेल्या धान्याचीसुद्धा नासधूस करत असल्यामुळे नागरिकांना पाळत ठेवावी लागते. यादरम्यान काठी किंवा इतर साहित्याने त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास ही माकडे समूहाने हल्ला चढवितात.
माकडांच्या उच्छादाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 4:08 AM