लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : खैरी बिजेवाडा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाचगाव येथे १५ दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. वारंवार मागणी करूनही स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन ही समस्या साेडवायला तयार नसल्याने नागरिकांनी शनिवारी (दि. २९) ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबाेल करीत माेर्चा नेला. यात महिलांची संख्या लक्षणीय हाेती.
पाचगावची लाेकसंख्या ७००च्या वर असून, या नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. त्या टाकीत पाणी चढविण्यासाठी साैरऊर्जा माेटरपंप बसविण्यात आला आहे. या साैरऊर्जा माेटरपंपाची कधी केबल खराब हाेते; तर कधी माेटरपंप बिघडताे. या बाबींची दर्जेदार व कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे टाकीत पाणी चढत नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही ही समस्या साेडविली जात नसल्याने नागरिकांनी शनिवारी ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर माेर्चा नेला. यावेळी महिलांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र राेषही व्यक्त केला. सरपंच ऊर्मिला खुडसाव व ग्रामविकास अधिकारी पी. पी. मालापुरे यांनी ही समस्या तातडीने साेडविण्याची ग्वाही दिल्याने नागरिक तूर्तास शांत झाले आणि त्यांनी आंदाेलन मागे घेतले. ही समस्या वेळीच न साेडविल्यास तीव्र आंदाेलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
...
सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यास घेराव
यावेळी संतप्त नागरिकांसह महिलांनी सरपंच ऊर्मिला खुडसाव व ग्रामविकास अधिकारी पी. पी. मालापुरे यांना घेराव घातला हाेता. प्रशासनाच्या नियाेजनशून्य कारभारामुळे ही पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आराेपही नागरिकांनी यावेळी केला. ऊर्मिला खुडसाव व पी. पी. मालापुरे यांनी ही समस्या रविवारी (दि. ३०) साेडविण्यात येणार असून, बाेअरवेलवरून पाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची ग्वाही दिल्याने नागरिक तूर्तास शांत झाले.