राजीव सिंहलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरात सिटी बसेसचे संचालन सुरू झाले आहे. एसटी महामंडळानेही १८ हजार बसेस रस्त्यावर आणल्या आहेत. परंतु नागपूर शहर बससेवा सुरू करण्याची प्रतीक्षा अजूनही सुरू आहे. आता परिस्थिती अशी झाली आहे की उभ्या असलेल्या ६० टक्के बसेसचे टायर व बॅटरी खराब झाली आहे. वेळीच बससेवा सुरू झाली नाही तर सिटी बसेस भंगार झाल्याशिवाय राहणार नाही.
नागरिकांच्या हितासाठी शहर बससेवा सुरू होणे गरजेचे आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, इतर शहरात बसेस सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यांतर्गत एसटी बसेस धावू लागल्या आहेत, तर नागपूर शहरात बससेवा सुरू करण्यास अडचण कसली. मनपातील काही अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण शहर अडचणीत आले आहे. राज्य सरकारला आता यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे. राज्य सरकारने जेव्हा अधिकार दिले, तेव्हा बस संचालनाचे निर्देशसुद्धा देऊ शकतात. परंतु मनपाचे अधिकारी स्वत:ला राज्य सरकारच्या वर मानत आहे. शहर बससेवेत ४३२ रेड बस, ५ इलेक्ट्रिक बसेस आहेत. आणखी ४० इलेक्ट्रिक बसेस सहा महिन्यात मनपाला मिळणार आहेत. शहर बससेवेत कार्यरत तीन हजार कर्मचारी सहा महिन्यापासून वेतनापासून वंचित आहेत. महिनाभरात बससेवा सुरू न झाल्यास शहर बससेवेचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
- एसटी सुरू झाली, सिटी बस का नाही?राज्यात जिल्ह्यांतर्गत एसटी बसेस सुरू झाल्या आहेत. प्रवासीदेखील उपलब्ध होत आहेत. सुरक्षा नियमाकडे लक्ष ठेवून आवागमन सुरू झाले आहे. राज्यात १८ हजार एसटी बसेस रस्त्यावर धावत आहेत. दिल्लीत १५ हजार सिटी बसेस धावत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक शहर जेव्हा संक्रमण वाढत होते, तेव्हाही बसेसचे संचालन सुरू होते. सध्या मुंबईत संक्रमण कमी होत आहे. नागपूर शहरात बससेवा सुरू होत नसल्यामुळे गरीब व मध्यमवर्गीयांना त्रास होत आहे.