नागपूर : शहरातील परिसंस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी निसर्गआधारित पर्याय शाेधणे महत्त्वाचे आहे. जैवविविधता टिकवायची असेल तर शहरात ग्रीन कव्हर वाढविणे आवश्यक आहे, असे मत महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) येथे विश्व पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त बाेलत हाेते. याप्रसंगी भारतीय मेट्राेलाॅजिकल विभाग, पुणेचे हवामान संशाेधन व सेवा प्रमुख डॉ. डी. एस. पै, विप्राेचे दिन्नी लिंगराज, सीएसआयआर-नीरीचे संचालक डॉ. एस. चंद्रशेखर, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. साधना रायलू प्रामुख्याने उपस्थित हाेते. राधाकृष्णन यांनी, घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याचे सांगत नाग नदी, तलाव आणि झऱ्यांच्या जीर्णाेद्धारासाठी नीरीच्या संशाेधकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. डाॅ. पै यांनी जलवायू परिवर्तनावर चिंता व्यक्त केली. भारतीय हवामान सेवा भारतासह दक्षिण आशियायी देशांना हवामान बदलामुळे येणाऱ्या संकटाच्या वेळी निर्णय घेण्यास उपयाेगी ठरत असल्याचे सांगितले. लिंगराज यांनी आपले विचार मांडले. नीरीचे संचालक डाॅ. एस. चंद्रशेखर यांनी ग्लाेबल वार्मिंग व जलवायू परिवर्तनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नीरीच्या संशाेधकांद्वारे सुरू असलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात शिक्षक व विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.