रामटेक : शहरासह तालुक्यातील काेराेनाचे वाढते संक्रमण व शहरात भरणारा आठवडी बाजार लक्षात घेता, रामटेक शहरात रविवारी दिवसभर चाेख पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता.
तालुक्यात काेराेना संक्रमण आणि मृत्युदर वाढत असून, ते राेखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययाेजना केल्या जात आहे. वारंवार आवाहन करूनही काही नागरिक व तरुण विनाकारण राेडवर फिरत असतात. प्रसंगी बाजारात खरेदी करण्यासाठी गर्दीही करतात. दंडात्मक कारवाई करूनही काही नागरिक जुमानत नाहीत. नागरिकांचा हा बेजबाबदारपणा काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडत असल्याने, पाेलिसांनी याला आळा घालण्यासाठी रविवारी दिवसभर रामटेक शहरात पाेलीस बंदाेबस्त लावला हाेता. शहरातील बस स्थानक चाैक, लंबे हनुमान मंदिर परिसर व महात्मा गांधी चौकात अधिक बंदाेबस्त हाेता. पाेलीस कर्मचारी रखरखत्या उन्हात दिवसभर शहरातील विविध भागांत गस्त घालत हाेते. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने शहरात दिवसभर शुकशुकाट दिसून आला.