नागपूर : जमिनीच्या संदर्भातील सिटी सर्व्हेची कामे गेल्या दीड वर्षापासून ठप्प पडली आहेत. कधी कोरोनाच्या कारणाने, तर कधी ऑनलाइन प्रणालीमुळे कामेच होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
नागपूर शहरासोबत लगतच्या भागात झपाट्याने विकास होत आहे. ठिकठिकाणी फ्लॅट बांधण्यात येत आहे. फ्लॅटची खरेदी-विक्रीची दस्त नोंदणी होत आहे. परंतु आता त्याचे म्यूटेशन करण्यास अडचण येत आहे. शासनाने जागेच्या नोंदणीत होत असलेली अडचण व गैरव्यवहाराला चाप लावण्यासाठी ही प्रणाली ऑनलाइन करण्याचे ठरविले. त्यासाठी सॉफ्टवेअरही तयार करण्यात आले. या सॉफ्टवेअरमध्ये फ्लॅटचे म्यूटेशन करण्याची तरतूद नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नगरभूमापन कार्यालय १, २, ३ मध्ये ऑनलाइनमुळे सर्व कामे ठप्प पडली आहेत. लोकांनी दीड वर्षापूर्वीपासून दस्तावेज कार्यालयाला सादर केले आहे. कोरोनामुळे नगरभूमापनचे कार्यालय बंद होते. आता ऑनलाइनच्या अडचणी असल्याचे सांगितले जात आहे. नामांतरण, मोजणी, वारसा प्रकरणात कुठल्यातरी त्रुट्या काढून कामे पेंडिंग ठेवली जात आहेत. ऑनलाइनच्या नावाखाली लोकांची कामे थांबली आहेत. कार्यालयाच्या चकरा मारून मारून लोकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे.
- वर्षभरापासून लोकांची प्रकरणे कार्यालयात प्रलंबित आहेत. कामे पेंडिंग पडल्याचे नेमके कारण काय, यासंदर्भात कुठेही सूचना माहिती दिलेली नाही. कामे होत नसल्याच्या वाढत्या तक्रारीबाबत वरिष्ठांकडेसुद्धा अधिकारी गाऱ्हाणी मांडत नाही. ऑनलाइन प्रणाली जोपर्यंत सुरळीत होत नाही, तोपर्यंत पूर्वीप्रमाणेच लोकांच्या केसेस हाताळण्यात याव्यात.
खेमराज दमाहे, अध्यक्ष, वेद फाउंडेशन
- स्वॉफ्टवेअरमध्ये नोंदच होत नाही
भूमी अभिलेख कायद्यात फ्लॅटच्या म्यूटेशनची तरतूद नाही. त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये त्यांची नोंद नसल्याने ते करता येत नाही, अशी माहिती भूमिअधीक्षक जे.बी. दाबेराव यांनी दिली.