नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर हे जीनोम सिक्वेंसिंगचे नोडल सेंटर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. बिलगेट्स फाऊंडेशनचे जपैगो व युएस ८ तर्फे जीनोम सिक्वेंसर मशीन एम्सला मिळाली आहे. कोरोनाच्या उपचारात जीनोम सिक्वेंसिंगचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य आजारातील व्हायरसच्या सिक्वेंसिंगसाठी या मशीनचा उपयोग करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात याचे प्रशिक्षण सुरू होणार असल्याची माहिती एम्सच्या व्यवस्थापक व सीईओ डॉ. विभा दत्ता यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना डॉ. दत्ता म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात एम्समध्ये सर्वात पहिली कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट सुरू झाली होती. आम्ही कोरोनाच्या ४ लाख टेस्ट केल्या. आता जीनोम सिक्वेंसिंगद्वारे व्हायरसच्या प्रभावाचे अध्ययन करण्यात येईल. एका आठवड्यात ५० सॅम्पल सिक्वेंसिंग केले जाऊ शकते. कोरोनाबरोबरच अन्य आजारातही सिक्वेंसिंगसाठी ही मशीन उपयोगात येईल.
डॉ. दत्ता म्हणाल्या की, एम्समध्ये दररोजची ओपीडी १२०० ते १३०० रुपयांची आहे. पदवीसाठी १२५ व पदव्युत्तराच्या ५० जागा आहेत. ३५० बेडची व्यवस्था आहे. युरोलॉजी, न्यूरोलॉजी व गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभाग जून-जुलै महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. येथे बऱ्याच आरोग्य सेवा नि:ल्क आहेत, तर काही सेवांसाठी किरकोळ शुल्क घेण्यात येते.
पत्रपरिषदेला अधिष्ठाता डॉ. मृणाल फाटक, अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, मायक्रोबॉयोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. मीना मिश्रा, डॉ. सोनाक्षी, डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. श्वेता कावलकर आदी उपस्थित होते.
- लिव्हर, किडनी ट्रान्सप्लांटची सुविधा नाही
डॉ. दत्ता यांनी सांगितले, एम्समध्ये लिव्हर, किडनी ट्रान्सप्लांटची सुविधा उपलब्ध नाही. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. एम्सने बेला व नंदनवनच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला दत्तक घेतले आहे. तिथे एम्सचे डॉक्टर सेवा देतात.
- वॅमकॉन २०२२ संमेलन उद्यापासून
एम्स नागपूरच्या मायक्रोबॉयोलॉजी विभाग व विदर्भ असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबॉयोलॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १० एप्रिलदरम्यान एम्समध्ये तिसरे वार्षिक संमेलन वॅमकॉन २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचा विषय ‘मॅन वर्सेस मायक्रोब्स : दी सी सॉ राईड’ आहे. संमेलनात मध्यभारतातून २००मायक्रोबॉयोलॉजिस्ट सहभागी होत आहेत. ही माहिती आयोजन समितीच्या सचिव डॉ. मीना मिश्रा यांनी दिली. त्यांनी सांगितले की, संमेलनादरम्यान कार्यशाळा, परिसंवाद, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात येईल.