नागपूर : राज्य मंत्रिमंडळाने माेठा निर्णय घेत अजनी वनाच्या लढ्याला अर्धे यश मिळवून दिले आहे. मात्र पूर्ण विजयासाठी वृक्षप्रेमींचा संघर्ष अविरत कायम आहे. ‘टुगेदर वुई कॅन’च्या तरुण कार्यकर्त्यांकडून सातत्याने प्रयत्न चालले आहेत. कुणाल माैर्य यांच्या नेतृत्वात या तरुणांनी आता स्वाक्षरी अभियान राबवून लाेकांना अजनीतील हजाराे झाडे वाचविण्यासाठी जागृत करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे अजनी येथे इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्प राबविला जात असून यामध्ये हजाराे झाडांचा बळी जाणार आहे. ही झाडे वाचविण्यासाठी पर्यावरणवादी संघटनांकडून गेल्या ८ महिन्यांपासून आंदाेलन केले जात आहे. याच कडीत आता स्वाक्षरी अभियान जाेडले गेले आहे. टुगेदर वुई कॅन ग्रुपच्या तरुण कार्यकर्त्यांनी गेल्या २० दिवसांपासून सातत्याने शहरातील वेगवेगळ्या भागात स्वाक्षरी अभियान राबविले आहे. व्हीएनआयटी, रामनगर येथून हे स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आले. यानंतर एनआयटी गार्डन अयाेध्यानगर, सक्करदरा तलाव परिसर, रेशीमबाग मैदान, महाल गांधी गेट, वन भवन सेमिनरी हिल्स, वाॅकर्स स्ट्रीट, स्वामी विवेकानंद स्मारक अंबाझरी तलाव, व्यंकटेशनगर, नंदनवन, दयानंद पार्क जरीपटका, शिवनगाव मैदान, जयताळा या भागात अभियान राबविण्यात आले.
आता ऑटाेवरही झाडांसाठी जागृती
हम नागपूरकर संस्थेतर्फे अजनी वनातील झाडांप्रति जागृती निर्माण करण्यासाठी शहरातील ऑटाेंची मदत घेतली जात आहे. अजनी वन वाचवाचे बॅनर लावून असंख्य ऑटाेवर जनजागृती करण्यात येत आहे. शनिवारी नागपूर रेल्वे स्टेशनवर नगरसेवक मनाेज गावंडे व वृक्षमित्र मनीष चांदेकर यांच्या नेतृत्वात अभियानाला सुरुवात करण्यात आली. वसुंधरा अभियानांतर्गत ही माेहम राबविली जात असून अजनी वनातील झाडे वाचवून हिरवळीसाठी नागपूर शहराला टाॅप १० शहरांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना चांदेकर यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ता प्रवीण बबलू तलहा, ॲड. हेमंत बालेकर, राजेश चाळीसगावकर, राहुल भाजीपाले, अभय कुलकर्णी, सचिन सकरडे, रोशन शेंडे आदी पर्यावरण कार्यकर्ता या अभियानात सहभागी आहेत.