नागपूर : मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरातील रामनगर येथील नागरिकांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. नाईक तलाव, लेंडी तलावाची दुर्गंधी, गडरलाईनच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने या परिसरात सोयीसुविधा उपलब्ध करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
नाईक तलावाची दुर्गंधी
नाईक तलावाची अवस्था अतिशय खराब झाली आहे. तलावात गडरलाईनचे पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तलावाची सफाई करण्यात येत नाही. तलावाला लावलेली लोखंडाची ग्रील असामाजिक तत्त्वांनी चोरून नेली आहे. तलावाच्या परिसरात असामाजिक तत्त्व जुगार खेळणे, दारू पिणे असे गैरप्रकार करतात. गार्डनच्या परिसरात लाईट नसल्यामुळे लहान मुलांची गैरसोय होते. परिसरातील नागरिक तलावात कचरा टाकतात. त्यामुळे या तलावाची सफाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
गडरलाईनच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त
रामनगरमधील गडरलाईन नेहमीच चोक होते. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर वाहते. या भागात नेहमीच दुर्गंधी राहते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात गडरलाईनचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे त्यांना मनस्ताप होतो. महापालिकेने या भागातील गडरलाईनची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.
लेंडी तलावात झाले अतिक्रमण
रामनगरला लागूनच लेंडी तलाव आहे. हा तलाव पूर्णपणे बुजला आहे. या तलावाच्या जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. पावसाळ्यात या तलावाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. याशिवाय अनेक नाल्यांचे घाण पाणी लेंडी तलावात सोडण्यात येत असल्यामुळे, या भागातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे लेंडी तलावावर नागरिकांनी केलेले अतिक्रमण हटवून या तलावाची सफाई करण्याची तसेच तलावात सोडण्यात येणारे नाल्याचे पाणी बंद करण्याची गरज आहे.
नाईक तलावाची सफाई करावी
नाईक तलावाचे पाणी घाण झाल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाईक तलावाची सफाई करण्याची गरज आहे.
-किशोरीलाल भवर
असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करावा
असामाजिक तत्त्व नाईक तलावाच्या परिसरात जुगार खेळणे, दारू पिणे असे गैरप्रकार करतात. त्यामुळे पोलिसांनी या असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा देण्याची नागरिकांची मागणी आहे.
-सुनिता डोंगरे
गडरलाईन दुरुस्त करावी
रामनगरात गडरलाईन नेहमीच चोक होते. घाण पाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे महापालिकेने गडरलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी आहे.
-प्रभा सोनकुसरे
गार्डनमध्ये लाईट, ग्रीलची व्यवस्था करावी
नाईक तलावाशेजारील गार्डनमध्ये लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार राहतो. त्यामुळे लहान मुलांची गैरसोय होते. तलावाला लावलेली लोखंडाची ग्रील चोरट्यांनी चोरून नेली आहे. त्यामुळे गार्डनमध्ये लाईट, तलावाला लोखंडी ग्रीलची व्यवस्था करावी.
-चेतना पितंबरा, नागरिक
लेंडी तलाव स्वच्छ करावा
लेंडी तलावात नाल्याचे घाण पाणी सोडण्यात येते. पावसाळ्यात तलावाला पूर येऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरते. त्यामुळे लेंडी तलाव स्वच्छ करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.
-पिंकी ठवकर, नागरिक
नाईक तलावात कचरा टाकू नये
नाईक तलावातील पाणी घाण झाले आहे. अनेक नागरिक या तलावात कचरा आणून टाकत असल्यामुळे तलावाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून तलावाची सफाई करण्याची गरज आहे.
-श्रावण पारधी