प्रभाग १४ मध्ये ४६.३१ टक्के मतदानाचा नीचांक : पारडी-भांडेवाडीने वाढविली शान; प्रभाग २५ मध्ये सर्वाधिक ६४.०१ टक्के मतदान नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी ५३.७२ टक्के मतदान झाले. एकूण ११ लाख २४ हजार ६३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मनपा प्रशासनाने केलेल्या जनजागृतीनंतरही २०१२ मध्ये झालेल्या मतदानाच्या तुलनेत यावेळी टक्केवारी फक्त १.७२ ने वाढली. पश्चिम नागपुरातील सिव्हिल लाईन्स, भरतनगर, टिळकनगर या सारख्या पॉश वस्त्यांमध्ये अत्यल्प मतदान झाल्याने प्रभाग १४ मध्ये सर्वात कमी ४६.३१ टक्के मतदान झाले. तर पूर्व नागपुरातील पारडी, भांडेवाडी सारख्या कमी प्रगत वस्त्यांनी मतदानाचा आलेख वाढविल्यामुळे प्रभाग २५ मध्ये सर्वाधिक ६४.०१ टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणुकीत पुरुषांच्या पाठोपाठ महिलांनीही मतदान केले. ५ लाख ९० हजार २७३ पुरुषांनी तर ५ लाख ३४ हजार ३५८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. झोनच्या आधारावर विचार करता लकडगंज झोन सरासरी ५७.८९ टक्क्यांसह मतदानात आघाडीवर राहिला. या झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २२, २३, २४ व २५ मध्ये रेकॉर्ड मतदान झाले. मतांचा विचार केला तर प्रभाग ८ मध्ये सर्वाधिक ३४ हजार ५५८ मतदारांनी मतदान केले. तर टक्केवारीत सर्वात पुढे राहिलेल्या प्रभाग २५ मध्ये ३२ हजार ५३४ मतदारांनी मतदान केले.
सिव्हिल लाईन्स, भरतनगरने झुकवली मान
By admin | Published: February 23, 2017 2:08 AM