नागपूर : बलशाली राष्ट्र निर्माण करायचे असेल तर राष्ट्रभावना निर्माण होऊन नागरिक राष्ट्राचा घटक म्हणून उदयास येणे गरजेचे आहे. याकरिता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत सुसंस्कारी मानवी वर्तनातून राष्ट्र विकासाची दिशा दर्शवली असल्याचे प्रतिपादन विश्वस्नेह फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत ठाकरे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजित राष्ट्रसंत व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन विभाग प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे यांची उपस्थिती होती. 'राष्ट्र विकासाचे अपरिहार्य तत्त्वज्ञान - राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज' या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. ठाकरे यांनी राष्ट्रसंतांचे देश आणि मानवी वर्तनाबाबत विचार सांगितले.
राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून राष्ट्र विकासाचे मूलभूत तत्व सांगितले आहे. देशाला विकासाच्या दिशेने न्यायचे असेल तर मानवाच्या वर्तनाकडे लक्ष दिले पाहिजे, असे राष्ट्रसंत म्हणतात. माणूस जन्माला येण्या अगोदर समाजाचा घटक असलेल्या आईकडे संस्काराचा खजिना आहे. याबाबत देखील ग्रामगीतेत महिलांनी कशी उन्नती करावी, याबाबत राष्ट्रसंतांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांना संबोधन करताना राष्ट्रसंतांनी देशाच्या चेहऱ्याकडे कोण लक्ष देईल असा उपदेश दिला आहे. कवी, पुढारी, साधुंना देखील राष्ट्रसंतांनी राष्ट्रभावना निर्माण करण्याबाबत उपदेश केला आहे. राष्ट्रसंत केवळ लिखाणच करीत नव्हते तर प्रत्यक्ष कृतीत देखील त्यांचा सहभाग राहत होता.
महाराजांच्या शब्दांमध्ये तत्वज्ञानाचा गाभा आहे. महाराजांचा तत्त्वज्ञानाचा गाभा समाजाला सांगण्याची गरज असल्याचे डॉ. ठाकरे म्हणाले. प्रास्ताविक राष्ट्रसंत अध्यासन विभाग प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी यांनी केले. संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी आभार मानले.