नागपूर : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ ११ फेब्रुवारी राेजी आयाेजित करण्यात आला आहे. भारताचे सरन्यायाधीश न्या.डाॅ.डी.वाय. चंद्रचूड हे या दीक्षांत समारंभाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
वारंगा, बुटीबाेरी येथे विधि विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात सकाळी ११.४० वाजता हा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे कुलपती न्या.भूषण गवई, प्र-कुलपती व मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश न्या.संजय गंगापूरवाला तसेच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.विजेंदर कुमार व कुलसचिव डाॅ.आशिष दीक्षित प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
शैक्षणिक सत्र २०१६ पासून राष्ट्रीय विधि विद्यापीठाची बॅच सुरू झाली आहे. त्यानंतर, काेराेनामुळे शैक्षणिक सत्रावर परिणाम झाला हाेता. त्यामुळे विधि विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ या वर्षी हाेत आहे. यामध्ये एल.एल.बी. पदवीच्या दाेन बॅच आणि एल.एल.एम. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पाच बॅचेसच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यात पदवीच्या दाेन बॅचमध्ये एल.एल.बी. झालेल्या १५८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. यासह २०१६ ते २०२० पर्यंतच्या पाच बॅचमधील ५६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर एल.एल.एम. पदवी समारंभाच्या दरम्यान प्रदान करण्यात येईल. याशिवाय ६ विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. शैक्षणिक सत्रात सर्वाेत्तम ठरलेल्या विद्यार्थ्यांना २५ सुवर्ण पदकांनी गाैरविण्यात येणार आहे.