नागपूर : भाजपचे माजी नगरसेवक बाल्या बोरकर हे मनपाच्या परिवहन विभागातील टेंडर घोटाळा उघड करणार असल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र बोरकर यांनी त्यांना मनपात कार्यरत असलेल्याच एका कर्मचाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. खळबळजनक बाब म्हणजे धमकी देत असताना संबंधित कर्मचाऱ्याच्या बाजूला भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे बसले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे भाजपच्या अंतर्गत वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी कार्यकर्ता म्हणून कर्मचाऱ्याला भेटलो होतो असे सांगत त्याने कुणाला फोन लावला याची कुठलीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात कोणाच्या दाव्यांमध्ये तथ्य आहे व घडलेला हा प्रकार केवळ धमकीचा आहे की, यामागे पक्षांतर्गत राजकीय स्पर्धा आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बाल्या बोरकर हे मंगळवारी टेंडर घोटाळा उघड करण्यासाठी पत्रपरिषद घेणार होते. मात्र काही कारणांमुळे ती पत्रपरिषद त्यांनी रद्द केली. बोरकर यांनी केलेल्या आरोपांनुसार निखिल कावडे नावाच्या कर्मचाऱ्याला बंटी कुकडे यांनी तीन वर्षांअगोदर नोकरीला लावले होते. कावडे व त्याचे दोन साथीदार कामावर येतच नव्हते व तरीदेखील वेतन घेत होते. याबाबत मनपा आयुक्तांकडे दोन दिवसांअगोदर तक्रार केली. यावरून संतापलेल्या कावडेने मंगळवारी रात्री ११.५१ व ११.५३ वाजता फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.
यासंबंधात बोरकर यांनी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली व कारवाई करण्याबाबत निवेदन दिले. यानंतर बोरकर यांनी रात्री व्हिडीओ जारी केला व त्या माध्यमातून टेंडर घोटाळ्यासह धमकी प्रकरणात काही दावे केले. त्यांनी केलेल्या आरोपांनुसार निखिल कावडेने ज्यावेळी फोन केला तेव्हा तो एका धाब्यावर शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्यासोबतच बसला होता. त्याच्याविरोधात तक्रार केली म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे बोरकर म्हणाले. या आरोपांमुळे भाजपच्या अंतर्गत वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कुकडे म्हणाले, कार्यकर्त्याला भेटलो तर वावगे काय?
याबाबत कुकडे यांना विचारणा केली असता त्यांनी निखिलची भेट घेतल्याचे स्पष्ट केले. निखिल हा भाजयुमोचा उपाध्यक्षदेखील आहे. त्याच्या नोकरीच्या ठिकाणी काही अडचण आल्याने भेटायचे असल्याचे त्याने सांगितले. मी रात्री एका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होतो. त्यामुळे त्याला तिथेच बोलाविले. त्याने तिथून कोणाला फोन लावले व काय बोलला याची मला काहीही कल्पना नाही. कार्यकर्ता या नात्याने मी त्याला भेटलो यात वावगे काय, असा सवाल कुकडे यांनी केला.
पोलिसांकडून कारवाई का नाही ?
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप बाल्या बोरकर यांनी केला आहे. त्यांना मी धाब्याचे सीसीटीव्ही फुटेजदेखील दिले आहे. मात्र पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याची चौकशीदेखील केलेली नाही. जर कारवाई झाली नाही तर उपोषणाला बसेन असा इशारा त्यांनी दिला. पोलिसांनी या प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून, बोरकर यांनी दिलेल्या निवेदनावर चौकशी सुरू असल्याची माहिती तेथील ठाणेदार अतुल सबनीस यांनी दिली.
यामुळे रद्द झाली पत्रपरिषद
दरम्यान, बोरकर यांची मंगळवारची पत्रपरिषद का रद्द झाली याबाबत विविध कयास लावण्यात येत होते. मात्र माझ्यावर कुणाचाही दबाव नाही असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी सदर उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात माझे जवळचे नातेवाईक झाडे यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराला गेलो होतो व दुपारनंतर मुलाला खूप ताप आला. त्यामुळे त्याला दवाखान्यात दाखल केले. यामुळे पत्रपरिषद रद्द केली. मात्र टेंडर घोटाळ्याप्रकरणी मी सर्वोच्च न्यायालयात जाईन, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.